जैतापूर-माडबनमध्ये होणारा महासंहारक अणुऊर्जा प्रकल्प झाल्यास कोकण भकास होईल. त्याहीपेक्षा माणसाच्या जीवनावरही परिणाम होणार आहेत. कोकणाला पुरेशी वीज उपलब्ध असताना विध्वंसक प्रकल्प कोकणात होऊ नये म्हणून सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्य़ात घरोघरी चळवळ उभी राहायला हवी, असे डॉ. मंगेश सावंत यांनी आवाहन केले.
श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भूवन सावंतवाडी यांनी आयोजित केलेल्या देशभक्त प्रभाकरपंत कोरगांवकर व्याख्यानमालेतील ‘जैतापूर अणुभट्टी : विकास की भकास कोकण?’ या विषयाचे पुष्प गुंफताना डॉ. सावंत यांनी विचार मांडले.
यावेळी राज्यमंत्री दीपक केसरकर, राजेंद्र फातर्पेकर, लेखक प्रवीण बांदेकर, रमेश बोंद्रे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. मंगेश सावंत यांनी अणुभट्टी, अणुऊर्जा व अणुभट्टीचा युद्धसामग्री बनविण्यासाठी लागणाऱ्या प्ल्युटोनियमच्या निर्मितीबाबत माहिती देत स्वातंत्र्यपूर्व काळापासून जगात अणुस्पर्धा व विध्वसंक भूमिका अशी बळावली त्याचे सविस्तर विवेचन करताना जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाला सर्वानी विरोधच करायला हवा असे स्पष्ट केले.
सौर, पवनऊर्जासारखे विविध पर्याय खुले असताना जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न करत डॉ. मंगेश सांवत म्हणाले, जैतापूरमध्ये होणारा अणुऊर्जा प्रकल्प महासंहारक असतानादेखील शास्त्रज्ञ व लेखक जनतेची दिशभूल करत आहेत, त्यांना सर्वसामान्य जनतेशी देणेघेणे नाही अशी टीका डॉ. सावंत यांनी केली.
रत्नागिरी व सिंधुदुर्गाला अणुऊर्जा प्रकल्पाचा त्रास होणार आहे असे नव्हे, तर अध्र्या महाराष्ट्राला त्याचे परिणाम भोगावे लागतील. भूकंपप्रवण क्षेत्र असल्याचे अहवाल असूनदेखील शास्त्रज्ञांनी जनतेची दिशाभूल चालविली आहे. अणुऊर्जा प्रकल्पाबाबत भारत जगातील अन्य देशांनी भोगलेले परिणाम अभ्यासत नाही, अशी खंतदेखील डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.
यावेळी राजेंद्र फातर्पेकर यांनी कोकणातील अणुऊर्जा प्रकल्प रद्द होण्यासाठी प्रत्येकाने चळवळ उभी करण्याचे आवाहन केले. यावेळी लेखक प्रवीण बांदेकर यांनी प्रास्ताविक केले.