जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदाधिका-यांच्या निवडीबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी उद्या (गुरुवार) बारामतीत बैठक बोलावली असतानाच विरोधी विखे-भाजप-शिवसेना आघाडीनेही वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आमदार शिवाजी कर्डिले त्यासाठीच मुंबईत तळ टोकून आहेत.
बँकेच्या नव्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीसाठी परवा (शुक्रवार) संचालक मंडळाची पहिली सभा बोलावण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-थोरात गटाने २१ पैकी ११ जागाजिंकल्या. काठावरचे बहुमत हा या आघाडीला धक्का असून, विरोधी विखे-भाजप-शिवसेना आघाडीने १० जागा जिंकल्याने बँकेतील सत्तास्थापनेत चुरस निर्माण झाली आहे.
थोरात-राष्ट्रवादी गटाचे बहुमत लक्षात घेता पहिल्या वर्षी राष्ट्रवादीला अध्यक्षपदाची संधी मिळेल, असा अंदाज असून त्यादृष्टीने निर्णय घेण्यासाठी अजित पवार यांनी उद्या (गुरुवार) बारामती येथे जिल्हय़ातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीमध्ये उदय शेळके, सीताराम गायकर, चंद्रशेखर घुले असे चौघे अध्यक्षपदासाठी इच्छुक असले तरी ज्येष्ठ नेते तथा बँकेचे माजी अध्यक्ष यशवंतराव गडाख यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो, असे सांगण्यात येते.
दरम्यान, विरोधी विखे-भाजप-शिवसेना आघाडीने हालचाली सुरू केल्याचे समजते. संचालक मंडळाच्या निवडणुकीतही विखे व भाजप यांनी ऐनवेळी एकत्र येऊन नवी समीकरणे तयार केली. त्याच धर्तीवर पुन्हा हालचाली सुरू आहेत. विशेषत: भाजपमध्ये त्यासाठी जोरदार हालचाली सुरू असून आमदार कर्डिले शिवाजी कर्डिले पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असल्याचे समजते. ते मुंबईतच तळ ठोकून आहेत. दुसरीकडे माजी आमदार राजीव राजळे हेही पक्षाच्या वतीने या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत आहेत. पक्षीय पातळीवर विचार झाला तर भाजपने आपल्याला संधी द्यावी, असाही विचार त्यांनी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवल्याचे समजते.