भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी जोरादार टीका केली आहे. स्थानिक पातळीवर जातीपातीच राजकारण केल्यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, गोपीनाथ गडावर त्यांनी केलेलं वक्तव्य हे भाजपाच्या सच्चा कार्यकर्त्यास दुखवणारं असल्याच सांगत, ज्याला आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही, ते महाराष्ट्रात काय फिरणार व काय दिवे लावणार? असं देखील खासदार काकडे म्हणाले आहेत.   गोपीनाथ गडावरील भाषणावेळी, कोणताही पक्ष एका व्यक्तीच्या मालकीचा नसतो, माझ्या वडिलांनी आयुष्य झिजवून पक्ष सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविल्याने हा पक्ष माझ्या बापाचा आहे. मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचे असेल, तर निर्णय घ्यावा,असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

पंकजा मुंडे यांनी काल जे वक्तव्य केले. ते भाजपच्या सच्चा कार्यकर्त्याला दुखावणारे आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं, ते मागील पाच वर्षात कृतीत आणलं असतं, तर त्यांचा नक्कीच एक लाख मतांनी विजय झाला असता. काल  त्यांनी जे समजाबद्दल वक्तव्य केलं तेच जर त्यांनी पाच वर्षे सत्तेत असताना कृतीत आणलं असतं, तर चित्र वेगळं असतं. पाच वर्षे त्यांच्याकडे दोन महत्वाची खाती होती. एवढं असताना जर तुम्हाला तुमचा मतदारसंघ सांभाळता येत नाही, तर महाराष्ट्रात काय तुम्ही फिरणार आणि काय दिवे लावणार? ज्याला आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही, त्या व्यक्तीने आता मी पक्ष वाढवेल, मी हे करेल, मी ते करेल असं बोलणं गरजेचं नव्हतं, असं देखील काकडे म्हणाले.

याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच मी राज्यसभेवर निवडून आलो, हे मला चांगलं आठवतं. गोपीनाथ मुंडे यांनी सर्वांना सांभाळलं होतं. मात्र पंकजा मुंडे यांनी सर्व समाजातील लोकांकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागलं असल्याचेही काकडे म्हणाले. शिवाय, आपल्या पराभवाचं खापर दुसऱ्या एखाद्या नेत्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या फोडणं योग्य नाही. जनतेशी जर नाळ जुडलेली असेल तर कधीच पराभवाला सामोरे जावं लागत नाही. माझ्यासह अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी जवळ केलं नाही. जातीपातीचं राजकारण स्थानिक पातळीवर केल्यामुळे व दुर्लक्षामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. पक्षावर दबाब टाकून स्वतःच्या पदरात काही, तरी मिळवण्याची नेहमीचीच सवय आहे. खरतर माझा सहकारी पडावा असं कोणत्याही मुख्यमंत्र्यांना वाटत नसतं. हा केवळ स्वतःचा पराभव दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे.