ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर यांच्या खासदार निधीमधून अडीच कोटी रुपये ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या दहा रुग्णालयांसाठी देण्यात आले. याबाबतची पत्रे खासदार केतकर यांनी आज (शुक्रवार) जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना देण्यात आली.

ठाणे जिल्हा रुग्णालयात सिव्हिल सर्जन डॉ.कैलास पवार यांच्याशी चर्चा करताना, तेथील अनेक प्रश्न लक्षात आल्याने संदीप आचार्य यांनी खासदार कुमार केतकर यांच्याशी विकास नाईक यांच्या माध्यमातून संपर्क साधून खासदार निधीमधून काही निधी मिळेल का? अशी विचारणा केली. यानंतर खासदार केतकर यांनी तत्काळ २५ लाख रुपये निधी देण्याची तयारी दाखवली. तसेच, त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या गरजांबाबत बोलणे झाले असता, केतकर यांनी हवा तेवढा निधी देण्याची तयारी देखील दाखवली.

या पार्श्वभूमीवर संदीप आचार्य यांनी सिव्हिल सर्जन डॉ.पवार व उपसंचालक डॉ.गौरी राठोड यांच्याबरोबर चर्चा करून वेगवेगळ्या रुग्णालयांच्या गरजा लक्षात घेऊन प्रस्ताव तयार केले. याबाबतची माहिती खासदार केतकर यांना देण्यात आली. यानंतर खासदार केतकर यांनी ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या १० रुग्णालयांना अडीच कोटी रुपयांचा निधी खासदार फंडातून देण्याचा निर्णय घेतला.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे खासदार केतकर यांनी अडीच कोटींच्या निधीची पत्र दिली. यावेळी सिव्हिल सर्जन डॉ कैलास पवार, संदीप आचार्य व विकास नाईक आदी उपस्थित होते.

करोना काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देऊन खासदार केतकर यांनी अन्य लोकप्रतिनिधींसमोर एकप्रकारे उदाहरण निर्माण केलं आहे. अन्य खासदारांनीही आपला निधी करोना सामाजिक बांधिलकी म्हणून दिला तर राज्यातील आरोग्य विभागांच्या अनेक रुग्णालयांना रुग्ण सेवेसाठी मोठी मदत होऊ शकेल.