खासदार नवनीत कौर राणा आणि आमदार रवी राणा या दोघांच्याही कुटुंबातील सात जणांना करोनाची बाधा झाली आहे. नवनीत कौर राणा यांच्या सासूबाई, सासरे, नणंद, पुतणे, भाची या सगळ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तसंच आमदार रवी राणा यांच्या अंगरक्षकालाही करोना झाला आहे. राणा कुटुंबातल्या ज्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे त्यांना उपचारांसाठी नागपूर येथे पाठवण्यात आलंआहे. तर आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्यासह इतर सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

नवनीत राणांच्या कुटुंबाबाबत ही माहिती समजताच अमरावती येथील शंकरनगर मध्ये असलेल्या त्यांच्या घरी गर्दी होते आहे. मात्र आमदार रवी राणा यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.

काय म्हणाले आहेत रवी राणा?
आज माझे कुटुंब करोनाच्या संकटात सापडे आहे. माझे आई, वडील, बहीण, जावई, पुतण्या, भाची आणि एका अंगरक्षकाला करोनाची बाधा झाली आहे. आमची विचारपूस करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. तरीही या काळात सगळ्यांनीच योग्य ती काळजी घ्यावी. गर्दी करु नये, करोनाशी लढाई आपल्याला जिंकायची आहे असं आवाहन रवी राणा यांनी केलं.

आमदार रवी राणा यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. कोणीही चिंता कारायची गरज नाही. संयमाने स्वतःची काळजी घेऊनच आपल्याला करोनावर मात करायची असल्याचे ते म्हणाले. माझे आई- वडील आज ७०-७२ वर्षांचे आहेत. वृद्ध मंडळींची अधिक काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. करोनाविरुद्धचा लढा आपण नक्कीच जिंकू असे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे. दरम्यान या सगळ्यांवर नागपूरमध्ये उपचार सुरु असून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यासह सर्व सदस्य होम क्वारंटाइन झाले आहेत.