हिंगोली मतदारसंघात चर्चेला नवी फोडणी

हिंगोली : नांदेड येथे काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या सभेत खासदार राजीव सातव यांच्या अनुपस्थितीमुळे हिंगोली मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. महाआघाडीच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमास सातव यांना निमंत्रण होते की नाही, ते कोणत्या कारणामुळे गैरहजर होते, याविषयी कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होत्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि सातव यांच्यामध्ये मतभेद असल्याने असे गैरहजेरीचे चित्र दिसत असल्याचे कार्यकर्ते सांगत होते. मात्र, या अनुषंगाने सातव यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले, अहमदाबादमध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या बैठका सुरू असल्याने या कार्यक्रमास हजर राहता आले नाही.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्यतील हदगाव व किनवट हे दोन विधानसभा मतदारसंघ तर यवतमाळ जिल्ह्यतील उमरखेड या मतदारसंघाचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यतील तीन मतदारसंघ असल्याने हिंगोलीचे राजकीय गणित तीन जिल्हय़ांतील मतदार ठरवितात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हिंगोलीतून राजीव सातव यांनी मोदी लाटेतही यश मिळवले होते. मात्र, त्यांच्याकडे आता गुजरात निवडणुकीचा कारभार असल्याने ते लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार असतील की नाही, याविषयी शंका घेतल्या जातात. त्यांनीही एका जागेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी गुजरातमधील जागा निवडून आणणे महत्त्वाचे असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व खासदार सातव यांच्यात मतभेद असल्याची चर्चा जाहीरपणे सुरू झाली होती. या पाश्र्वभूमीवर सातव यांच्या गैरहजेरीची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस कार्यसमितीची बैठक गुजरात येथील अहमदाबाद येथे २८ फेब्रुवारी रोजी होणार असून, या बैठकीस पहिल्यांदाच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ही मंडळी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्याचे सर्व नियोजन गुजरातचा प्रभारी म्हणून माझ्यावर आहे. गुजरातमधील २६ आणि दिव-दमणमधल्या दोन अशा २८ लोकसभा मतदारसंघांतील जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मार्चपर्यंत मराठवाडय़ात उपलब्ध असणार नाही, असे खासदार राजीव सातव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. हिंगोलीतून निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णयही मार्च महिन्यातच घेतला जाईल, असेही ते म्हणाले.