हिंगोली लोकसभा मतदारसंघातून अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ चे काम सुरू होणार आहे. त्यासाठी जमीन संपादनात शेतकऱ्यांच्या विविध अडचणी आहेत. त्यावर मार्ग काढण्याच्या निमित्ताने तसेच या महामार्गावरील प्रलंबित मुद्दे मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात भेट घेतली. ती भेट राजकीय नव्हती, असे स्पष्टीकरण खासदार राजीव सातव यांनी दिले आहे. खासदार राजीव सातव यांनी शनिवारी भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतल्यानंतर राजकीय क्षेत्रात सुरू झालेल्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर सातव यांनी उपरोक्तचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, माझ्या मतदारसंघातून जाणाऱ्या महामार्गावरील प्रलंबित प्रश्न दूर करणे तसेच महामार्गासाठी जमीन संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या असलेल्या अडीअडचणी व मंत्रिमहोदयांसमोर शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी घेतली आहे. कळमनुरी शहरातून तसेच आखाडा बाळापूर येथे बायपास होणार आहे. वारंगा फाटा, भाटेगावसह २१ गावातील शेतकऱ्यांची १५३.७३ हेक्टर जमीन जाणार आहे. या संदर्भात जाहीर प्रगटन प्रसिध्द झाल्यानंतर ८३ शेतकऱ्यांचे आक्षेप आले. तर भाटेगाव, वारंगा फाटा या भागातील शेतकऱ्यांची फळबागायतीची शेती महामार्गात जाणार असल्याने त्या शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मावेजा मिळावा, महामार्गाचे प्रलंबित काही प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याचे ते म्हणाले.

वारंगा फाटा शिवारातून जाणाऱ्या बायपासचा सर्वे यापूर्वी नागपूर ते तुळजापूर या महामार्गासाठी झाला. येथील शेतकऱ्यांची जमीन संपादीत करण्यात आली असून आता सुरु असलेल्या महामार्गासाठी दुसऱ्या बाजूने बायपास करण्यासाठी शेतीसंपादीत करीत असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी निरोप केल्यामुळे दोन्ही बायपास एकत्र करावे, अशी विनंती करण्यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधी माझ्यासोबत उपस्थित होते. त्यामध्ये माजी खासदार स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव संभाजीराव देशमुख, दिलीप देसाई, सतीष कदम, चंद्रशेखर गावंडे, ग्यानबाराव हाके, भाऊसाहेब सालेसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी भेटीदरम्यान सोबत होते, असे ते म्हणाले.