पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मतदारसंघातील मालुंजे बुद्रुक (श्रीरामपूर) दत्तक घेतले आहे. गावाचा सर्वांगीण विकास यातून होणार आहे.
खासदार लोखंडे यांनी मंगळवारी मालुंजे बुद्रुक गावाला भेट देऊन गावक-यांशी संवाद साधला. गावातील प्रश्न समजून घेतले. लाख बंधा-यातून नियमितपणे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले. प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे शिर्डी शिंगणापूर रस्त्याची दुरुस्ती, गावठाणासाठी जागा उपलब्ध करणे, व्यायामशाळा, गावातील लहानमोठे रस्ते, स्वच्छतागृह, शाळा ही कामे करण्यात येणार आहेत. मालुंजे बुद्रुक हे गाव दत्तक घेतल्याने मतदारसंघातील मिनी सिटीच्या धर्तीवर असणा-या सुविधा गावासाठी उपलब्ध होणार आहेत. याचबरोबर आजूबाजूच्या बहुतांश गावांनाही या योजनांचा फायदा होणार आहे.
सरपंच अशोक बडाख यांनी गावातील विविध प्रश्न मांडले. भाजपचे ज्येष्ठ नेते हेरंब औटी म्हणाले, समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खो-यामधील मुळा, प्रवरा व गोदावरी नदीपात्रात वळविल्यास भरपूर पाणी उपलब्ध होऊन जायकवाडी धरणाचा पाणीप्रश्नसुद्धा सुटेल. हे पाणी बीडला दिले तरी आमचा विरोध राहणार नाही. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब बडाख, शिवसेनेचे राजेंद्र देवकर, सचिन बडदे, कारभारी बडाख, बाजार समिती संचालक निवृत्ती बडाख, भाऊसाहेब बडाख, सोन्याबापू बडाख, प्रभाकर बडाख, अण्णासाहेब बडाख आदी उपस्थित होते.
लाखचा कॅनॉल वाहणार
मालुंजे बुद्रुक गावाची लोकसंख्या ५ हजार ५०० असून साक्षरतेचे प्रमाण ७० टक्के आहे. आणेवारी ४८ टक्के आहे. येथे दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. २३ किमी लांबीचा ब्रिटिशकालीन लाख कॅनॉल हा १९८२ साली वाहता झाला होता. त्यानंतर या कॅनॉलमधून पाणी आले नाही. सध्या या कॅनॉलला चारीचे स्वरूप आले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील ६ व नेवासा तालुक्यातील १४ गावांच्या पाणीपुरवठा योजना या कॅनॉलवर होत्या. मात्र पाणीच नसल्याने या योजना बंद आहेत. मालुंजे बुद्रुक गाव दत्तक घेतल्यामुळे लाख कॅनॉल पुन्हा वाहणार आहे.