सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा रद्द ठरवल्यानंतर ते पुन्हा कसं मिळवायचं, यावर राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. यासंदर्भात मराठा आरक्षण उपसमितीच्याही बैठका सुरू आहे. मात्र, त्याचवेळी मराठी आरक्षणाचा मुद्दा सुरुवातीपासून लावून धरणारे खासदार संभाजीराजे भोससे हे देखील यासंदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात येत्या २८ मे रोजी मुंबईत ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. मात्र, मराठा आरक्षणासंदर्भात त्यांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांवर शंका घेणाऱ्यांना संभाजीराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सडेतोड शब्दांमध्ये सुनावले आहे. “मी काही आज येऊन टपकलो नाहीये, माझी वाटचाल २००७ सालापासूनची आहे!” असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

२८ तारखेला मुंबईत मांडणार भूमिका!

मराठा आरक्षण उपसमितीच्या आज झालेल्या बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकार यासंदर्भात नियमानुसार पुढील प्रक्रिया करत असल्याची माहिती दिली आहे. मात्र, या बैठकीसंदर्भात आपल्याला काही माहिती नसल्याचं संभाजीराजे भोसले म्हणाले आहेत. “उपसमितीच्या बैठकीत काय झालं, त्याची मला कल्पना नाही. पण आम्ही आमच्या बाजूने काम सुरू केलं आहे. राज्यातले सर्व समन्वयक, कायदेतज्ज्ञ, अभ्यासक यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे की या परिस्थितीतून आपण बाहेर कसं पडायचं? सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द झाल्याचं स्पष्ट केलं आहे. यापुढे नेमकं काय आहे? ही केंद्राची जबाबदारी आहे की राज्याची जबाबदारी आहे? १०२ व्या घटनादुरुस्तीमध्ये काय सिद्ध होणार आहे? या सगळ्याचा अभ्यास सुरू आहे. २८ तारखेला पूर्ण समाजाच्या वतीने आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू”, असं ते म्हणाले आहेत.

मी तरुण दिसत असलो, तरी आहे पन्नासचा!

दरम्यान, संभाजीराजे भोसले यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेला भाजपाने पाठिंबा दर्शवल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारताच संभाजीराजांनी आपल्याला कुणाच्या पाठिंब्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. “मला कुणाचा पाठिंबा घेण्याची गरज नाही. मला मराठा समाजाचा पाठिंबा आहे. मी समाजाचा एक घटक आहे. माझी ही वाटचाल आत्ताची नसून २००७ सालापासून सुरू आहे. मी आत्ता येऊन टपकलो नाहीये. मला काहीतरी करून दाखवायचंय किंवा मला काही राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत असं नाहीये. माझी चळवळ मी खासदारही नव्हतो, तेव्हापासून सुरू आहे”, असं ते म्हणाले. तसेच, “मी जरी तरुण दिसत असलो, तरी आहे पन्नास वर्षांचा”, अशी कोटीही त्यांनी यावेळी केली.

मराठा समाज अस्वस्थ

“मराठा समाज अस्वस्थ आहे. त्यांना वाटतंय की त्यांच्यावर अन्याय झाला आहे. आम्ही जगायचं कसं? असा प्रश्न ते विचारत आहेत. बाकीच्या समाजांना मिळत असलेलं आरक्षण आम्हाला काढून घ्यायचं नाहीये, पण आमच्याकडे कोण बघणार? ही त्यांच्या मनातली खदखद आहे”, असं देखील खासदार संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले.

“चंद्रकांत पाटलांनी असं म्हणणं मराठा आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारं”

पुन्हा रस्त्यावर उतरावं लागू नये…!

संभाजीराजे भोसले सध्या महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी दौरा करत असून येत्या २७ तारखेला ते यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार आहेत. “केंद्र आणि राज्य सरकारांनी अशी भूमिका घ्यावी की समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लागू नये. आधीच ५८ मोर्चे काढले आहेत. अजून किती वेळा लोकांना रस्त्यावर आणायचं?”, असा परखड सवाल त्यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना विचारला होता.