सातारच्या राजकारणाची अवस्था आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय अशी झाली असून, जुनी माणसं हे असंच चालायचं असं म्हणतात, पण आजची नवी पिढी हे किती दिवस चालायचं असा प्रश्न करतात. पण वारकरी संप्रदाय हे असे चालायचेच नाही म्हणत आहे आणि म्हणूनच आम्ही परिवर्तनाच्या लढाईत उतरलो आहोत. सातारा लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही ‘आप’चा झाडू हातात घेतला असल्याची भूमिका अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे संघटक बंडातात्या कराडकर यांनी जाहीर केली.
येथील ‘आप’च्या प्रचार कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्यसनमुक्ती युवक संघाचे राज्याध्यक्ष विलासबाबा जवळ, ‘आप’चे उमेदवार राजेंद्र चोरगे, डॉ. मधुकर माने, अ‍ॅड. संदीप चव्हाण, व्ही. के. पाटील, विवेकानंद गुजर, समीर संदे यांची उपस्थिती होती.
बंडातात्या कराडकर म्हणाले, की आमची वारकरी संघटना निष्पक्ष असून, आत्तापर्यंत आमच्यावर कोणा पक्षाचा शिक्का पडलेला नाही आणि भविष्यातही पडू देणार नाही. पण लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात राजकीय स्वच्छता करण्यासाठी आम्ही ‘आप’ला समर्थन देत आहोत. आमचे सर्व कार्यकर्ते राजेंद्र चोरगेंबरोबर राहतील. तसेच नगर लोकसभेच्या जागेसाठी आमचा पाठिंबा बी. जी. कोळसे पाटील यांना राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारचा उमेदवार देताना राष्ट्रवादीने पक्षहिताबरोबर लोकभावनाही समजून घ्यायला हव्या होत्या. तसे न झाल्याने आमच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांची घुसमट झाली. उमेदवार कोणत्या पक्षाचा हे माहीत नाही, पण तो स्वच्छ चारित्र्याचा व कार्यक्षम असला पाहिजे, अशी आमची माफक अपेक्षा आहे. म्हणून तर ‘आप’बरोबर जाण्याचा आमचा सर्वानुमते निर्णय झाला आहे. आमची लढाई कोणा व्यक्ती वा पक्षाविरोधात नाही तर ती प्रवृत्ती विरोधात आहे आणि लोकसभेचा निकाल हा विधानसभेतील परिवर्तनाची नांदी असेल, असे मत बंडातात्यांनी नोंदवले.