देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पत्नींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांना ठोकून काढू असा दम खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. आमदार असो की कोणीही, त्याला ठोकणार म्हणजे ठोकणार, अशा शब्दांत त्यांनी ठणकावले.
जे सैनिक आपले संपूर्ण आयुष्याची आहुती देतात. त्यांच्या बायकांना माहीत ही नसतं की आपला पती परत घरी येईल का नाही ते. त्यांच्याबद्दल असे शब्द बोलणे अशोभनीय आहे. लाज वाटायला पाहिजे. कसं बोलतात, काय बोलतात, कधी बोलायचं. हे माझ्या बुद्धिच्या पलीकडे आहे. शप्पथ सांगतो, आमदार असू दे .. चुकून आलाय आत्ता निवडून.. ठोकणार म्हणजे ठोकणार, असे वक्तव्य उदयनराजे यांनी केले.
एखाद्या आमदाराने असे बोलणे निषेधार्ह आहे, असे ते म्हणाले. आमदार परिचारक यांच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील आजी- माजी सैनिकांच्या संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्याचवेळी या संघटनांनी खासदार उदयनराजे भोसले यांनाही निवेदन दिले.
आमदार परिचारक यांनी पंढरपूर जिल्ह्यातील भोसे येथे जिल्हापरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत विरोधकांवर टीका करण्याच्या नादात सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पत्नींबद्दल बेताल वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण राज्यात पडसाद उमटताना दिसत आहे. अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात मोर्चे निघत आहेत. गाव बंद ठेऊनही परिचारक यांचा निषेध करण्यात येत आहे. आमदार परिचारकांनी माफी मागूनही त्यांच्याविरोधातील असंतोष कमी होताना दिसत नाही.