ज्याप्रमाणे दादा कोंडकेंची नाडीची सोडायची स्टाईल होती. तशी माझी ही कॉलरची स्टाईल आहे. माझ्या कॉलरच्या स्टाईलमुळे कोणाला अडचण येण्याचे कारण नाही, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर होणाऱ्या चर्चेला उत्तर दिले. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त परळी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

गोपीनाथ मुंडेंनी मला वडिलांचे प्रेम दिले, उदयनराजे भावूक

ते म्हणाले, कारण नसताना अलीकडच्या काळात अनेक मान्यवर मंत्र्यांनी, आजी, माजी लोकांनी माझ्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर टीका टिप्पण्णी केली. मला समजत नाही. मी त्यांना एकच उत्तर दिले. ज्याप्रमाणे दादा कोंडकेंची नाडीची स्टाईल होती. तशी ही माझी स्टाईल आहे. त्यामुळे याची कोणाला अडचण येण्यासारखे नाही, असा टोला त्यांनी लगावला. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले यांच्याप्रमाणे कॉलर उडवत त्यांच्या या स्टाईलवर मिश्किल भाष्य केले होते. त्यावेळीही उदयनराजे यांनी पवार यांच्या त्या वक्तव्यावर भाष्य केले होते.

मुंडेसाहेब मला नेहमी म्हणायचे की लोकांसाठी जो झटतो आणि आयुष्यभर जो त्यांच्यासाठी काम करतो. त्यालाच अशी कॉलर उडवण्याचा अधिकार आहे, असे म्हणत तेही ही स्टाईल करायचे. म्हणून मी सुद्धा असेच करतो, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गोपीनाथ मुंडे हे माझ्यासाठी मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शकही होते. ज्या ज्यावेळी आम्ही भेटायचो त्या-त्यावेळी ते जुन्या आठवणी सांगायचे. माझ्या वडिलानंतर वडिलकीच्या नात्याने ज्यांनी मला जवळ केले ते गोपीनाथ मुंडे यांनीच, अशी आठवण सांगताना उदयनराजे भोसले हे भावूक झाले होते. त्यांच्या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता.