पर्यावरण दिनाचं औचित्य साधत खासदार उदयनराजे यांनी आपलं मत व्यक्त केलं. “आपला देश प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. प्रत्येक व्यक्तीनं पर्यावरण विषयक सजग राहिल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू शकू. आणि खऱ्या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु“, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. आपला भारत देश विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. मात्र, असे असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो, हे आपण त्सुनामी, निसर्ग आणि तौतेसारखी चक्रीवादळे, भूकंप, ढगफुटी, महापूर, दुष्काळ, रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवलं आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीनं पर्यावरणाचा समतोल राखल्यास आपण खर्‍या अर्थानं समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निसर्गचक्रात सर्वच सजीवांचा महत्त्वाचा कार्यभाग असतो. या परस्परावलंबी जैवविविधतेमुळेच पृथ्वीवरील सर्व सजीव-निर्जीव व्यवस्था टिकून आहेत. माणसाने वृक्षतोड करून वन्यजीवांचे हक्काचे निवारे हिसकावून घेतलेच. पण त्याचबरोबर गरज नसताना, केवळ छंद म्हणून वन्यजीवांची शिकार करून त्यांच्या अस्तित्वावर घाला घालायचा प्रयत्न केला. मनुष्येतर प्राण्यांच्या बाबतीत २०१८ सालच्या एका अभ्यासात समोर आलेली आकडेवारी धक्कादायक आहे. संख्येने मनुष्यप्राणी जगातील जीवसृष्टीच्या फक्त ०.०१ टक्का आहे. मात्र त्याच्यामुळे गेल्या पाच हजार वर्षांत पृथ्वीवरील ८३ टक्के सस्तन प्राणी आणि ५० टक्के वनस्पती नामशेष झाल्या आहेत. आज जगातील सस्तन प्राण्यांपैकी ६० टक्के प्राणी हे गायी, म्हशी, शेळ्या-मेंढय़ा असे पाळीव पशू आहेत आणि केवळ ४० टक्के सस्तन प्राणी वन्य अवस्थेत शिल्लक आहेत. जगातील एकूण पक्ष्यांपैकी ७० टक्के पक्षी हे कोंबडी, बदक असे पाळीव पक्षी आहेत, तर केवळ ३० टक्के पक्षी वन्य अवस्थेत आहेत. गेल्या ४०० वर्षांत सुमारे ८०० सजीव नामशेष झाले. आज दर दिवसाला सजीवांच्या १५० जाती नामशेष होत असून सुमारे १० लाख जाती नामशेष होण्याच्या उंबरठय़ावर आहेत आणि याला माणूस कारणीभूत आहे असे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन फॉर बायलॉजिकल डायव्हर्सिटी ही आंतरराष्ट्रीय संस्था सांगते. यामुळेच माणूस-वन्यजीव संघर्ष वाढतो आहे. वाघ, बिबटे यांचे माणसावरील हल्ले; हरीण, गवे, हत्ती यांनी केलेले शेताचे नुकसान; पक्षी, वटवाघळे यांनी केलेले फळशेतीचे नुकसान याचे प्रमाण वाढते आहे. टोळधाडीसारखी संकटे आल्यास माणूस हतबल होतो आहे.