मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. २ लाख ६० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. यासंबंधी राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा निर्णय झाला. “११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात MPSC ची परीक्षा होती. मात्र करोना आणि लॉकडाउनचं संकट होतं. काही प्रमाणात अजूनही आहे. त्यामुळे आम्ही एक सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाला मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

आजच खासदार उदयनराजे भोसले यांनीही एक फेसबुक पोस्ट लिहून MPSC ची परीक्षा पुढे ढकलावी असं म्हटलं होतं. मराठा समाज संयमी आणि शांत आहे पण प्रसंगी आक्रमकही होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं होतं. तर मराठा आरक्षण प्रकरणी वेळ पडल्यास आपण तलवारही उपसू शकतो असं वक्तव्य संभाजीराजेंनी केलं होतं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी संभाजीाजेंनीही केली होती. ज्यानंतर अखेर राज्य सरकारने ११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यातील २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही

MPSC च्या परीक्षेची तारीख सध्या आम्ही पुढे ढकलली आहे. मात्र यापुढे जी तारीख ठरेल त्या तारखेत बदल केला जाणार नाही. मराठा समाजाकडूनही आम्हाला परीक्षा पुढे ढकला अशी विनंती केली होती. आता जे विद्यार्थी  परीक्षेला पात्र आहेत तेच विद्यार्थी जेव्हा परीक्षा जाहीर होईल तेव्हा त्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. काही विद्यार्थी करोनाग्रस्त आहेत. काही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळालेला नव्हता. त्यामुळे ११ ऑक्टोबरची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र आता जी काही तारीख जाहीर होईल त्यामध्ये बदल होणार नाही. असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.