जायकवाडी धरणाचे संपूर्ण सर्वेक्षण व क्षमता निश्चित झाल्याशिवाय भंडारदरा, दारणा आणि मुळा धरणांतून पाणी सोडू नये आणि पाण्याची मागणी पूर्ण होण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांमधील पाणी गोदावरी खो-यात आणण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना व शेतक-यांच्या वतीने शनिवारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे करण्यात आली. प्राधिकरणासमोर याबाबतची पुढची सुनावणी आता ९ जुलैला होणार आहे.
जायकवाडी धरणात वरच्या भागातील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या वतीने अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, कारखान्याचे सभासद रवींद्र धावणे, राहाता येथील नागरिक संजय सदाफळ, सुनील सदाफळ आणि संघर्ष समितीच्या वतीने न्यायालयात यापूर्वीच याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दि. ५ मेला न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार याचिकाकर्त्यांनी शुक्रवारी मुंबई येथे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर आपले म्हणणे सादर केले. सभासदांच्या वतीने पाटबंधारे विभागातील निवृत्त सचिव आर. एम. लांडगे यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष रवि बुद्धिराजा, चित्कला झुत्शी आणि सोडल यांच्यापुढे म्हणणे मांडले.
लांडगे यांनी सांगितले, की जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून, शासनाने शेतीसाठी आवर्तनही सोडलेले आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा असताना भंडारदरा, दारणा आणि मुळा धरणांतील पाणी जायकवाडी धरणात सोडू नये. यापूर्वी धरणात पाणी सोडण्याचे कोणतेही आदेश शासनाचे आणि न्यायालयाचे नव्हते. ज्या वेळेस पिण्याचे पाणी वरील धरणात शिल्लक असेल, त्या वेळेस पाणी जायकवाडीस सोडण्यास कोणतीही हरकत नाही. मात्र वरच्या धरणातील पाणी काढून त्याचा विनियोग न करता ते अनधिकृतपणे उचलले जाते.
सध्या जायकवाडी धरणात ८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून भंडारदरा, दारणा आणि मुळा धरणांत एकूण ११ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे पाणी सोडण्यासारखी परिस्थिती नाही. जायकवाडी धरणात वर्षांनुवर्षे गाळ साठल्याने धरणाची क्षमता पुन्हा एकदा तपासून पाहण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच धरणाचे सर्वेक्षण आणि पाण्याचे नियोजन व अतिरिक्त पाणी निर्माण केल्याशिवाय पाण्याची मागणी पूर्ण होऊ शकणार नाही. त्यासाठी पश्चिम वाहिनीच्या नद्यांमधील पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचे प्रयत्न करावेत अशी मागणी या वेळी करण्यात आली.