28 February 2021

News Flash

दहावी-बारावीची परीक्षा तंत्रज्ञान सुसज्ज कधी होणार?

गैरप्रकार रोखण्यासाठी केवळ भरारी पथकांची नेमणूक, परीक्षा केंद्रांवर मोबाइल बंदी आणि परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण हे पारंपरिक उपाय केले आहेत.

संग्रहित छायाचित्र

प्रतिनिधी, पुणे

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाची तटबंदी उभारलेली असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ त्या बाबतीत अजून मागेच आहे. विद्यार्थ्यांची माहिती सरल प्रणालीद्वारे घेऊन त्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यापर्यंतच राज्य मंडळ पोहोचले आहे. त्यामुळे राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा तंत्रज्ञान सुसज्ज कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यंदा सीबीएसईने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र शोधण्यासाठी अ‍ॅप तयार केले. तर परीक्षा सुरक्षित करण्यासाठी कागदपत्रांना जिओ टॅगिंग, परीक्षा केंद्रांचे वेबकास्टिंग असे काही प्रयोग केले आहेत. आजपासून राज्यातील बारावीची परीक्षा सुरू होत असताना राज्य मंडळाने परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी केवळ भरारी पथकांची नेमणूक, परीक्षा केंद्रांवर मोबाइल बंदी आणि परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण हे पारंपरिक उपाय केले आहेत. राज्य सरकारचा स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान विभाग उपलब्ध असताना त्याच्या माध्यमातून परीक्षा केंद्रे सुरक्षित आणि तंत्रज्ञान सुसज्ज करणे शक्य आहे. मात्र, त्या दृष्टीने विचारही करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार एकीकडे राज्यात ६५ हजार शाळा डिजिटल झाल्याचा डंका पिटत असताना दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, लाईव्ह वेबस्ट्रिमिंग अशा तंत्रज्ञानाची मदत घेऊन सुरक्षितता वाढवण्याकडे दुर्लक्षच होत आहे.

‘राज्य मंडळ आणि सीबीएसई यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही. सीबीएसईच्या परीक्षा बहुतांश शहरी भागांमध्ये होतात. राज्य मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांची अनेक केंद्रे राज्यातील दुर्गम भागात असतात. त्या ठिकाणी नेटवर्क न मिळणे, सोयीसुविधा उपलब्ध होण्यात अडचणी असतात. राज्य मंडळ तंत्रज्ञानाचा वापर करत नाही असे नाही. कारण यंदा पहिल्यांदाच प्रवेशपत्रे ऑनलाइन देण्यात आली, त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सरल प्रणालीद्वारे करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांचा त्रास कमी झाला,’ असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी स्पष्ट केले.

——–

तंत्रज्ञान उपलब्ध होत असताना त्याचा वापर नक्कीच करायला हवा. दुर्गम-डोंगरी भागातील केंद्रांची संख्या फारच थोडी असते. मात्र, परीक्षा सुरक्षित होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराचा विचार होण्याची गरज आहे. राज्य मंडळाने अनेक बदल, नवीन प्रयोग ऑक्टोबरच्या परीक्षांमध्ये करून पाहिले होते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर थेट मुख्य परीक्षेवेळी करण्यापेक्षा फेरपरीक्षेवेळी करून पाहता येऊ शकतो. त्यात अपयश आल्यास फार नुकसान होण्याचा धोकाही नाही. किमान शहरी भागातील केंद्रांवर परीक्षांसाठी तंत्रज्ञान  वापरण्याची सुरुवात करणे अगदीच शक्य आहे. परीक्षेदरम्यान भरारी पथके केंद्रात आल्यावर विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते. तंत्रज्ञानाचा वापर केल्यावर पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांना सावधगिरी बाळगावी लागेल, मात्र त्याचा विद्यार्थ्यांना काहीच त्रास होणार नाही.

– डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 11:31 am

Web Title: msbshse hsc ssc exam use of old technology
Next Stories
1 लाल वादळ धडकणार, शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना
2 ‘याला म्हणतात सत्तेसाठी नंगा नाच’, नितेश राणेंची भाजपा-शिवसेना युतीवर टीका
3 भूकंपभीतीच्या सावटाखाली पालघरमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा!
Just Now!
X