महावितरणच्या वीज खांबांच्या रूपाने जिल्ह्य़ात जागोजागी मृत्यूदूत

डहाणू : करोनाकाळात वीजमीटर गणन घेता न आल्याचे कारण पुढे करीत ग्राहकांच्या माथी भरमसाठ देयके मारणाऱ्या महावितरणने वीजपुरवठा सुरळीत आणि सुरक्षितरीत्या पोहोचविण्यासाठी फुटकी कवडीही खर्च न करण्याचा विडा उचलल्याचा आरोप केला जात आहे.

डहाणू तालुक्यातील बहुतेक गाव-पाडय़ांमधील वीजवितरण व्यवस्था जुनाट झालेल्या खांबांच्या मदतीने तग धरून असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब गंजलेले आहेत. काही ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत आहेत, तर खांबावरील विजेच्या पेटय़ा उघडय़ा आहेत. त्यावर रानवेलींनी वेटोळी घातली आहेत. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत तवा गावातील विद्युत खांबांना गंज चढून त्यांना मोठाली छिद्रे पडली आहेत. त्यामुळे हे खांब कोसळण्याच्या स्थितीत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी महावितरणकडे तक्रारीही केल्या आहेत. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांना खांब बदलण्यासाठी वेळ मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

वरोती येथे शांताबाई बरलकर यांच्या घरावर हा जीर्ण विद्युत खांब सध्या उभा आहे.  तो कधी कोसळू शकतो, अशी त्याची स्थिती असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे महावितरणने धोकादायक विद्युत खांब बदलावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

तालुक्यातील चारोटी, वेती, वरोती येथे विद्युत खांबांची स्थिती धोकादायक झाली आहे. अनेक पाडय़ांतील विद्युत वितरण व्यवस्था जीर्णावस्थेत आहे. वीज वाहिन्या लोंबकळत आहेत. गेल्या महिन्याभरापासून नागरिक महावितरणकडे तक्रारी करीत आहेत. तरीही अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नसल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीत म्हटले आहे.

तारांलगत झाडे

डहाणू-नाशिक राज्य मार्गालगत लोकवस्तीच्या भागांत वीजतारांना लागून मोठमोठी झाडे आहेत. पावसाळ्यात सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे  वृक्षांच्या फांद्या वा कधीकधी काही झाडेच तारांवर येऊन पडतात. त्यामुळे अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यासाठी आवश्यक त्या ठिकाणी वृक्षांची छाटणी करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी जुन्या विद्युततारा आहेत. त्या बदलण्याची आवश्यकता असल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली. डहाणू तालुक्यातील धरमपूर येथील गंजलेले वीजखांब आणि रोहित्राजवळील उघडय़ा पेटय़ांमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. डहाणू तालुक्याच्या ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी वीजखांब जीर्णावस्थेत आहेत. काही तर मोडकळीस आले आहेत. त्यामुळे देखभाल कामासाठी या खांबांवर कर्मचाऱ्यांना चढता येत नाही.

गंजलेल्या १९ खांबांचा ‘आधार’

कासा : जव्हार तालुक्यातील जांभुळमाथा गावात विद्युत खांब गंजलेल्या अवस्थेत उभे आहेत. त्यामुळे सोसाटय़ाच्या वाऱ्यात हे खांब कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जांभुळमाथ्यावरील १३ वीजखांब गंजलेले आहेत. त्यामुळे ते तातडीने बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  यासाठीचे एक निवेदन महावितरणकडे देण्यात आले आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांना केराची टोपली दाखविल्याचा आरोप केला जात आहे. जांभुळमाथा गावाला दाभेरी येथील विद्युत केंद्रातून वीजपुरवठा केला जातो. दाभेरी ते जांभुळमाथ्यादरम्यान उभारण्यात आलेले १९ खांब सध्या गंजले आहेत.  तर काही खांब गंजून वाकले आहेत. त्यामुळे या भागात अपघाताची भीती जांभूळमाथा गावच्या सरपंच सावित्री भोरे यांनी व्यक्त केली.