लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : मागील तीन महिन्यात वादळ वाऱ्यासह पडलेल्या पावसाचा महावितरणच्या अकोला परिमंडळाला मोठा फटका बसला आहे. परिमंडळातील १३७९ वीज खांब पडले, तर १९१ किमी लांबीच्या वीज वाहिन्या तुटल्या आहेत. परिणामी परिमंडळातील ११२ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. युद्धस्तरावरील प्रयत्नाने त्या गावांमधील वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.

मागील तीन महिन्यात अनेकवेळा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. महावितरणची यंत्रणा उघड्यावरच असल्याने या अस्मानी संकटामुळे मोठे नुकसान झाले. परिमंडळातील अकोला जिल्ह्यात उच्चदाबाचे १८० आणि लघुदाबाचे ४६८ वीज खांब पडले. बुलडाणा जिल्ह्यात उच्चदाबाचे १८९ आणि लघुदाबाचे ३२४, तर वाशीम जिल्ह्यात ६८ उच्चदाबाचे आणि १५० लघुदाबाचे वीज खांब पडल्याच्या घटना घडल्या. वीज खांबासोबत अकोला जिल्ह्यातील २९ किमी लांबीच्या उच्चदाब वाहिन्या व ५७ किमी लांबीच्या लघुदाब वाहिन्याही तुटल्या होत्या. तीन ठिकाणचे रोहित्र कोसळले, २२ रोहित्रात बिघाड होऊन ते निकामी झाले.

१३७ ठिकाणच्या रोहित्रांचा डबा खराब झाला. बुलढाणा जिल्ह्यात ३२ किमी उच्चदाब व ६८.८ किमी लघुदाब वाहिनी तुटली होती. याशिवाय ९ ठिकाणचे रोहित्र कोसळले, २८ रोहित्र निकामी झाले. १७ ठिकाणचे रोहित्राचे डबे खराब झाले. तुलनेत वाशीम जिल्ह्यात कमी नुकसान झाले. ४.३ किमी लांबीची लघुदाब वाहिनी तुटली होती. वादळी वाऱ्याच्या संकटात उद्ध्वस्त झालेली यंत्रणा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. वादळामुळे अकोला १७४, बुलढाणा १५५ आणि वाशीम ११ लाख असे एकूण तीन कोटी ४१ लाखांचा मोठा आर्थिक फटकाही महावितरणला बसला आहे. अथक प्रयत्नाने बाधित झालेला ११२ गावाचाही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देखभाल व दुरूस्ती
पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महावितरणने संपूर्ण परिमंडळात देखभाल दुरूस्तीच्या कामांना गती दिली आहे. ही कामे वीज पुरवठा खंडित केल्याशिवाय करता येत नाहीत. त्यामुळे या काळात ग्राहकांनी सहकार्य करावे करावे, असे आवाहन अकोला परिमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.