भूमीगत वीजवाहक तारांसाठी १४० कोटी रुपयांचा महावितरणचा प्रस्ताव

विरार : जीर्ण झालेल्या खांबांवरील वीजवाहक तारा पडून होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी महावितरणाने वीज वितरण तारा भूमिगत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १४० कोटी रुपयांची प्रस्ताव त्यांनी शासनाकडे सादर केला आहे. वसई-विरारच्या किनारपट्टी भागात हा धोका जास्त असल्याने येथील वीजवाहक तारा भूमिगत केल्या जाणार असल्याचे महावितरणने सांगितले.

वसई-विरार भागात महावितरणची वीज वितरण व्यवस्था भूमिगत नाही. पारंपरिक पद्धतीने म्हणजेच लोखंडी खांब उभारून याचे विजेचे वितरण केले जात आहे. वितरण प्रणालीसाठी रोवण्यात आलेले खांब जुने झाले आहेत. त्यात तारांचा भार न पेलवल्याने काही ठिकाणी खांब वाकलेले असतात. अनेक भागांत  विद्युतवाहक तारा लोंबकळत असल्याचे चित्र पाहायला मिळते. लोंबकळणाऱ्या तारा तुटण्याच्या घटना घडल्या आहेत.

काहीवेळेला वीजेच्या अतिउच्च दाबामुळे वा पावसाळ्यात सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन त्यातून आगीच्या ठिणग्या बाहेर पडण्याच्या घटना वारंवर घडत असतात. त्यामुळे  अनेकदा वीजपुरवठा खंडित होत असतो.  किनारपट्टी भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण यंदाच्या पावसाळ्यात अधिक वाढले होते.

याबाबत महावितरणकडे नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत महावितरणने  वसई-विरारच्या किनारपट्टीतील भागांतील वीजवाहक तारा भूमिगत करण्याबाबत हालचाली सुरू केल्या.

यातील पहिला टप्पा म्हणून १४० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

खारे वारे मुळावर

किनारपट्टीवरील वीज वितरण व्यवस्था सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे तुटण्याचे प्रकार घडतच असतात. त्यातही खाऱ्या वाऱ्यामुळे तारा गंजतात. याच वेळी काही ठिकाणी खांबही गंजून वाकतात वा अचानक हे खांब कोसळण्याच्या घटनाही घडतात. हे खांब बदलण्यासाठी वेळ जातो. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे किनारपट्टीवरील अनेक गावे अंधारात जात असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या.