निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने दऱ्या, खोऱ्यांसह किर्र्र अभयारण्यातील प्रतापगडसह १६ गावांमधील कोसळलेली वीजयंत्रणा अथक प्रयत्नाने पुन्हा उभारून ‘प्रकाशमान’ कार्याची पोहोच देणाऱ्या महावितरणची आता, मंडणगड प्रकाशमान करण्यासाठी झुंज राहणार आहे.

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या वीजयंत्रणेची पुन्हा उभारणी करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील महावितरणच्या सात अभियंत्यांसह ५० कर्मचारी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड परिसरात युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करीत आहेत. ३ जून रोजी ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा कोकणच्या किनारपट्टीला मोठा तडाखा बसला. त्यात रायगड व रत्नाागिरीसह काही जिल्ह्यातील वीजयंत्रणेची मोठी हानी झाली. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ७,८०० वीजखांब जमीनदोस्त झाले.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी इतर जिल्ह्यातून महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांचे पथके पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे बारामती परिमंडलाकडून सातारा जिल्ह्यातील महावितरणचे अभियंते व जनमित्र तसेच कंत्राटदारांचे कर्मचारी मंडणगड तालुक्यात वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी पाठवले गेले.

या तालुक्यातील वेळास, उमरोली, बाणकोट, कुडुक बु. नारायणनगर आदी गावांच्या परिसरात जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा दुरुस्तीचे काम गेल्या ५-६ दिवसांपासून हे अभियंते व कर्मचारी करीत आहेत.

चक्रीवादळाच्या तडाख्याने मंडणगड तालुक्यातील वीजयंत्रणेला जबर तडाखा बसला आहे. या आपत्तीमध्ये खंडित झालेला वीजपुरवठा अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न अभियंते व कर्मचाऱ्यांकडून सुरू आहेत.

या पथकांमध्ये सहायक अभियंता नितीनराज माने, रुपेश लादे, दीपक घोलप, कनिष्ठ अभियंता किशोर कहर, नितीन खैरमोडे, राकेश पडवाल, वैभव राजमाने यांच्यासह जनमित्र सुनील गडकरी, ज्ञानदेव गुरव, संतोष प्रजापती, संजय बुधावले, विजय फाळके, तानाजी कसबे, चंद्रकांत झिंबरे, विठ्ठल पवार, प्रवीण कदम, दीपक टेंबरे, अजित माने, विजय मदने आदींसह कंत्राटदारांच्या ३० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.