शेकापच्या रायगड आणि मावळ मतदारसंघातील उमेदवारांना मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र या पाठिंब्याचा शेकापला रायगडमध्ये कितपत फायदा होईल याबाबत साशंकता आहे.
राज्यात मनसेच्या स्थापनेनंतर रायगड जिल्ह्य़ातील तरुण वर्गही मोठय़ा प्रमाणात मनसेकडे आकर्षित झाला होता. महाड पोलादपूर परिसरात जोरदार मुसंडी मारत राजकीय पक्षांची झोपही उडवली होती. महाडमध्ये पक्षाचे दोन नगरसेवकही निवडून आले होते. काही ग्रामपंचायतींमध्ये त्यांचे सदस्यही निवडून आले. मात्र नंतरच्या काळात पक्षाला उतरती कळा लागली.   
आज जिल्ह्य़ात मनसेकडे एकही ग्रामपंचायत नाही. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा एकही सदस्य नाही. त्यामुळे या पाठिंब्याचा शेकापला मतांच्या रूपाने कितपत फायदा होईल याबाबत साशंकता आहे. रायगड जिल्ह्य़ाची संघटना ही केवळ नेत्यांपुरती मर्यादित आहे.  पक्षाकडे एक जिल्हा संघटक, तीन जिल्हाध्यक्ष, सात उपजिल्हाध्यक्ष, महिला विभागात तीन जिल्हाध्यक्ष, सात उपाध्यक्ष तर विद्यार्थी सेनेत पाच जिल्हाध्यक्ष आणि सात उपाध्यक्ष असा नेत्यांचाच मोठा भरणा आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्य़ात मनसेने शेकाप उमेदवार रमेश कदम यांना जाहीर केलेल्या पाठिंब्याचा नेमका काय फायदा होईल हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन आणि महाड मतदारसंघात मनसेचे अस्तित्व नगण्य आहे, तर गुहागर आणि दापोली मतदारसंघातही खेड शहराचा काही भाग वगळता पक्षाची ताकद नाही. अशा परिस्थितीत मनसेने शेकाप उमेदवाराला दिलेला पाठिंबा हा नावापुरताच ठरणार आहे. याचा शेकापच्या मतांवर फारसा परिणाम होणार नाही.
राज्यातील नव्या राजकीय समीकरणांची या माध्यमातून मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पाश्र्वभूमीवर शेकाप-मनसे युतीची चाचपणी करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केला जाणार आहे. जिल्ह्य़ात शिवसेनेच्या मतांचे विभाजन करून ती मते मनसेकडे वळवता येतील का यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.  शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांना, मनसेच्या पाठिंब्याचा आपल्या उमेदवारांना चांगला फायदा होईल असा विश्वास वाटतो. मनसेमुळे शेकापच्या मतांमध्ये २० ते २५ हजारांची वाढ होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवाय रायगड आणि मावळ मतदारसंघात मनसे प्रमुख राज ठाकरे हे प्रत्येकी दोन जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे मतपरिवर्तनासाठी या दोन्ही सभा निर्णायाक ठरणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.