मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रायगड आणि मावळ मतदारसंघातील शेकाप उमेदवारांना पािठबा जाहीर केल्यानंतर बुधवारी अलिबाग येथे दोन्ही पक्षांच्या संयुक्त बठकीचे आयोजन करण्यात आले होते. शेकाप उमेदवार रमेश कदम यांच्या प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी या बठकीचे आयोजन करण्यात आले होते.
   या बठकीला शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, आमदार मीनाक्षी पाटील, शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते; तर मनसेकडून जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. मनोज चव्हाण, जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी, जिल्हा प्रमुख अतुल भगत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील जनता पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळली आहे. खासदार गीतेंनीही अपेक्षेप्रमाणे काम केलेले नाही. त्यामुळे मतदारांना तिसरा सक्षम पर्यायाच्या शोधात आहे. त्यामुळे शेकापच्या माध्यमातून त्यांना हा पर्याय मिळणार आहे. मनसे आणि बॅरिस्टर अंतुले यांच्या पािठब्यामुळे आमचा उत्साह वाढला आहे. दोन्ही पक्षांनी जोमाने काम केले तर येणारा खासदार हा आपलाच असेल असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
    पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार रायगड आणि मावळ मतदारसंघातील मनसेचा प्रत्येक कार्यकर्ता हा शेकाप उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही यावेळी मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी दिली. निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने दोन्ही पक्षांची रणनीती ठरवण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.