महामंडळाकडून दिरंगाई, एकूण १५० कोटी रुपये देणे बाकी

मुंबई : राज्य परिवहन महामंडळातून (एसटी) निवृत्त झालेल्या व विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या चारशे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची देणी महामंडळाने थकवली आहेत.

गेल्या अडीच वर्षांत राज्यातील सहा हजार कर्मचारी निवृत्त झाले असून त्यांची एकूण १५० कोटी रुपये देणी एसटी महामंडळाकडून बाकी आहेत. यातील ४०० निवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात एसटीचे जवळपास १ लाख कर्मचारी आहेत. वर्षांला हजारो कर्मचारी निवृत्त होतात. निवृत्तीनंतर त्यांना गॅ्रच्युईटी, भविष्य निर्वाह निधी, शिल्लक रजेचे पैसे व वेतनवाढीतील फरक दिला जातो. ही सर्व देणी २०१८ पर्यंत महामंडळाकडून निवृत्त कर्मचारी किंवा त्यांच्या पश्चात कुटुंबीयांना मिळत होती. परंतु २०१९ पासून मात्र हे पैसे देण्यात आलेले नाहीत. २०१९ पासून ते जून २०२१ पर्यंत सहा हजार कर्मचारी निवृत्त झाले. ग्रॅच्युईटी तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना मिळाली. परंतु मागील पाच वर्षांत वेतनवाढ झाल्यानंतर फरकाची रक्कम निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. ही रक्कम १५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.  सहा हजार निवृत्त कर्मचाऱ्यांपैकी मृत्यू झालेल्या ४०० कर्मचाऱ्यांचा कुटुंबीयांनाही देणी मिळाली नसल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.

एसटी महामंडळाला १५० कोटी रुपये रक्कम मोठी नाही. एसटी महामंडळाचा वर्षांचा नऊ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी तात्काळ मिळावीत. अजून किती कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मरण्याची वाट एसटी महामंडळ पाहणार आहे.

      – श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस  

निवृत्त कर्मचाऱ्यांची २०१८ पर्यंत देणी दिली आहेत. त्यानंतर  सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी व भविष्य निर्वाह निधीची रक्कम दिली आहे. उर्वरित देणी बाकी असून तीही लवकर देऊ.

      – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ