महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) पुणे विभागाने सातारा जिल्ह्य़ातील कोयनानगर येथील निवासस्थान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे निवासस्थान भाडेपट्टय़ाने चालवण्यास देण्यात आले होते. हे निवासस्थान महामंडळाने ताब्यात घेतले असून याच महिन्यात ते सुरू करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या पुणे विभागात महाबळेश्वर, पानशेत, माथेरान, माळशेज, कार्ला आणि भीमाशंकर अशी सहा निवासस्थाने आहेत. “महामंडळाच्या पुणे विभागात महाबळेश्वर, पानशेत, माथेरान, माळशेज, कार्ला आणि भीमाशंकर अशी सहा निवासस्थाने आहेत. त्यामध्ये आता कोयनानगर या सातव्या निवासस्थानाची भर पडली आहे. या निवासस्थानात २२ खोल्या, एक रेस्टॉरंट, बाग-बगिचा आहे. हे निवासस्थान कोयनानगर धरणाच्या वरील बाजूला असल्याने अतिशय नयनरम्य ठिकाणी आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना जंगल सफारीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे,” असं महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले.

अल्पदरात विविध सुविधा

पुणे विभागातील पर्यटन स्थळांमार्फत महसूल प्राप्त होण्यासाठी महामंडळाकडून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. सातारा जिल्ह्य़ातील कोयनानगर येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. त्या अनुषंगाने महामंडळाने अल्पदरात विविध सुविधा देणारे पर्यटक निवास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर महिन्यात हे पर्यटक निवासस्थान सुरू करण्यात येणार असून महामंडळाकडून करोनाबाबत सुरक्षिततेच्या अनुषंगाने व्यवस्थापन करण्यात येत आहे, असेही हरणे यांनी सांगितले.