मुंबई विद्यापीठाच्या वतीने डिजिटल इंडिया या उपक्रमाअंतर्गत डिजिटल डिग्री देण्याचा विचार आहे, तसेच कोकणासाठी नौदलाच्या मदतीने नौदल शिक्षणाचा उपक्रम सुरू करण्यासाठी प्राथमिक चर्चा करण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिली. पश्चिम घाट जैवविविधता सॅटेलाइटवरून ठरविण्यापेक्षा जैवविविधतेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सहभागातून ठरविता येऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पंचम खेमराज महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख बोलत होते. या वेळी कुलसचिव डॉ. खान, विनायक दळवी होते. संस्थेच्या कार्याध्यक्ष राजमाता श्रीमंत सत्त्वशीलादेवी भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. संस्थेच्या श्रीमंत शुभदादेवी भोसले, अ‍ॅड्. सुभाष देसाई, अ‍ॅड्. प्रमोद प्रभू अजगावकर व प्राचार्य डॉ. दिलीप भारमल आदी उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाअंतर्गत ७५० महाविद्यालये व १०५ संस्था आहेत. किनारपट्टीचे क्षेत्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येते. नौदलाच्या मदतीने विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम सिंधू स्वाध्यायच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. हा शैक्षणिक उपक्रम भारतातील किनारपट्टी भागातील विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणारा आहे, असे डॉ. संजय देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले. नौदलाच्या शैक्षणिक उपक्रमाचे रत्नागिरी उपकेंद्र व वेंगुर्लेचा भाग राहणार आहे. त्यासाठी नौदलाची मदत, अत्याधुनिक बोटीच्या मदतीने शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देताना गोवा अटलांटिका, मांडवीचाही उपयोग करून घेतला जाईल. शासनाच्या शाश्वत विकासाच्या माध्यमातून सिंधू स्वाध्याय आर्थिक उन्नतीसाठी पुढाकार घेणार आहे. त्यासाठी कुडाळ व वेंगुर्लेत छोटे-छोटे अभ्यासक्रम सुरू करता येतील. ऑग्रे टुरिझम, टुरिझम मॅनेजमेंट व टुरिस्ट गाइड, तसेच स्किल डेव्हलपमेंटचा शैक्षणिक उपक्रमासाठी पुढाकार घेणार असल्याचे देशमुख म्हणाले. सिंधुदुर्गातील सर्व नगरपालिकांनी एकत्र येऊन क्लस्टर पद्धतीने विकास साधावा म्हणून प्रयत्न करू, तसेच तळेरे येथे मॉडेल कॉलेजही उभे राहत आहे त्यातून सर्व महाविद्यालयांना प्रबोधन होईल, असे देशमुख म्हणाले. जैवविविधतेच्या दृष्टीने राज्यात ३८०० देवराया आहेत. त्यांचा आपण अभ्यास केला आहे. पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह मुद्दय़ावरून डॉ. गाडगीळ व डॉ. कस्तुरीरंजन समितीने अहवाल दिले. खरे तर जैवविविधांचा अभ्यास सॅटेलाइटच्या साहाय्याने करता येणार नाही. जैवविविधतेचे प्रमाण नेमके कोणत्या भूभाग किंवा भूप्रदेशात आहे तेथे जैवविविधतेचे संवर्धन करावे लागेल काय? असा र्सवकष अभ्यास करूनच इको सेन्सिटिव्ह जाहीर व्हायला पाहिज . असे डॉ. संजय देशमुख म्हणाले. देशात किंवा महाराष्ट्रात पर्यावरणीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी इको सेन्सिटिव्हचा पुनर्विचार किंवा चर्चासत्र घडविण्यासाठी एकत्रित यायला हवे, त्यातून इको सेन्सिटिव्हबाबतची दिशा ठरविण्याची गरज आहे. पश्चिम घाट विकास, तसेच खारफुटीचे क्षेत्र संरक्षितेबाबत संवेदनशीलता हवी, असे देशमुख म्हणाले. मुंबई विद्यापीठात वेगवेगळे १३ विभाग आहेत. आज विद्यापीठाच्या स्टाफ कमी झाला असल्याने कंत्राटी पद्धतीने काम करण्यात येते. त्यातील एक परीक्षा विभाग धोरणात्मक काम करीत आहे, पण परीक्षा विभागच चर्चेत असतो, डिजिटल डिग्री देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता विद्यापीठाने रत्नागिरीत उपकेंद्र सुरू केले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात महाविद्यालयांना विश्वासात घेऊन नवीन अभ्यासक्रम देण्याचा विचार आहे, असे डॉ. देशमुख म्हणाले.पंचम खेमराज महाविद्यालयाला आवश्यक असणारे नवीन अभ्यासक्रम विद्यापीठाच्या आधीन राहून निश्चितच दिले जातील. राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांच्यासह संस्थाचालकांच्या मागणीचा विचार नियमास अधीन राहून, करू असेही डॉ. संजय देशमुख म्हणाले.