साताऱ्यात करोना रूग्णवाढ घटलेलीच

कराड : करोना प्रादुर्भावाच्या महासाथीमध्ये आता म्युकरमायकोसिस म्हणजेच काळय़ा बुरशीची लागण झालेले रूग्णही वाढू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात करोना संसर्ग नियंत्रणात येत असतानाच आता ‘म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर करोनाच्या जवळपास सातपट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे करोनाबरोबरच ‘म्युकरमायकोसिस’ला रोखण्याचेही आव्हान प्रशासन व आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.

सातारा जिल्ह्यात आजवर म्युकरमायकोसिसची बाधा झालेल्या रूग्णांची १२२ वर पोहोचली आहे. त्यातील ६८ जण उपचाराधिन असून या आजाराने १९ रूग्ण दगावलेत. या आजारासाठीच्या उपचारात वापरण्यात येणारी औषधे जेमतेम उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. करोनाची रूग्णवाढ नियंत्रणात दिसत असलीतरी ही परिस्थिती बरी म्हणावी लागेल. पण, ती आपल्या मते समाधानकारक नसल्याचे डॉ. चव्हाण यांनी या वेळी स्पष्ट केले.

‘म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर १५.५७ टक्के असून, तो करोना बाधितांच्या मृत्यूदरापेक्षा ६.९५ टक्के म्हणजेच सुमारे सातपट अधिकचा असल्याचे दिसते आहे. सध्या जिल्ह्यात करोनाचा मृत्यूदर २.२४ टक्के आहे. आजवर १ लाख ८० हजार ६०७ करोना बाधित निष्पन्न होताना, त्यातील ४ हजार ४८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १ लाख ६५ हजार ९४५ रूग्ण उपचारांती बरे झालेत. आजमितीला १० हजार ७०८ रूग्ण विविध रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. ताज्या माहितीनुसार गेल्या २४ तासात नव्याने ८५६ करोनारूग्ण निष्पन्न होताना, १६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, ७३८ रूग्ण उपचारांती रूग्णालयाबाहेर पडले आहेत.