उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकं सापडलेल्या गाडीच्या मालकाचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. विधानसभेत अंबानी प्रकरणावरुन विरोधक गदारोळ घालत असतानाच दुसरीकडे मनसुख हिरेन यांचा मुंब्र्यात मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली. एकीकडे ठाणे पोलीस मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं सांगत असून दुसरीकडे मनसुख हिरेन यांच्या पत्नीने मात्र ही माहिती फेटाळली आहे. विमल हिरेन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वारंवार कांदिवली क्राइम ब्रांचमधील तावडे नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला असून हा कोण आहे याबद्दल आता चर्चा सुरु झाली आहे.

विमल हिरेन यांनी नेमकं काय सांगितलं –
“मी आणि माझं कुटुंब असा विचारही करु शकत नव्हतं. आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरी गेली होती. पोलीस जेव्हा कधी फोन करायचे माझे पती चौकशीसाठी जात होते. पोलीस तासनतास त्यांना बसवून ठेवायचे. कालही त्यांना बोलावलं होतं, ते गेले होते पण परत आले नाही. १० वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. कांदिवली क्राइम ब्रांचमधून तावडे म्हणून कोणाचा तरी फोन आला होता. ते गेल्यानंतर अर्ध्या तासात फोन बंद झाला. आम्ही रात्रभर वाट पाहिली. सकाळीपण काही पत्ता नसल्याने तक्रार दिली,” असं विमल हिरेन यांनी सांगितलं आहे.

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
“क्रॉफर्ड मार्केटमध्ये भेट झालेली ‘ती’ व्यक्ती कोण?,” अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी फडणवीसांचे गंभीर आरोप

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “कांदिवलीमधील क्राइम ब्रांचमधून तावडे यांचा फोन आल्यानंतर ते भेटण्यासाठी गेले होते. फक्त भेटण्यासाठी बोलावलं असल्याने मी जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांना कोणताही त्रास नव्हता. पोलिसांचा जेव्हा फोन यायचा तेव्हा ते जात असे. त्यांनी पोलिसांना पूर्ण मदत केली”.

अंबानी प्रकरण: फडणवीसांच्या गंभीर आरोपांवर सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान यावेळी त्यांनी पोलीस आत्महत्या केली असल्याचं सांगत आहेत त्यावरुन नाराजी व्यक्त केली. “पोलीस त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगत आहे. ते कधीच आत्महत्येचा विचार करु शकत नाहीत. त्यांच्याबद्दल ही अफवा पसरवली जात असून खूप चुकीचं आहे. याचा पूर्ण तपास झाला पाहिजे. आमच्या कुटुंबाला याचा खूप त्रास होत आहे”.

अंबानी प्रकरण: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे; अनिल देशमुखांची माहिती

ते कधीच आत्महत्या करु शकत नाही सांगताना विमल हिरेन यांनी पोलिसांवर कोणताही संशय नसल्याचं स्पष्ट केलं. “शेवटचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी आपल्याला कांदिवली क्राइम ब्रांचमधून फोन आला असून घोडबंदरला भेटण्यासाठी बोलावलं असल्याचं सांगितलं होतं,” अशी माहिती विमल हिरेन यांनी दिली.

एटीएस करणार तपास
“मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्या प्रकरणात गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणाच्या तपासासंबंधी विरोधकांकडून वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल. आम्ही हा तपास एटीएसकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.