लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीत जोरकस आघाडी घेणा-या काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या तोंडावरच गळती लागली आहे. मुदखेडच्या राम चौधरींपाठोपाठ मुखेड मतदारसंघात मोठा जनाधार असलेल्या राठोड बंधूंवरही भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाळे फेकले आहे.
काँग्रेसचे नगरसेवक आणि नांदेड मनपा स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतर्फे पहिले महापौर झालेले सुधाकर पांढरे मंगळवारी अचानक सेनेत दाखल झाल्याचे वृत्त आल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्या पाठोपाठ जिल्ह्य़ातील गारपीटग्रस्त भागाच्या पाहणीस आलेल्या मुंडे यांनी रात्री उशिरा कमळेवाडी (तालुका मुखेड) येथे जाऊन राठोड बंधूंची भेट घेतल्याने नांदेड मतदारसंघात महायुती सक्रिय झाल्याचा संदेश गेला. माजी आमदार किशन राठोड, त्यांचे बंधू माजी नगराध्यक्ष गोविंदमामा राठोड, तसेच त्यांचा गट राजकीयदृष्टय़ा कुंपणावर आहे. मुखेडच्या राजकारणातील ‘राज’ बंधूंनी सत्तेच्या बळावर त्यांना वाळीत टाकण्याचे धोरण जाणीवपूर्वक राबविल्याच्या पाश्र्वभूमीवर निवडणुकीत राठोड बंधू काय करणार, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.
खासदार मुंडे यांचा नांदेड दौरा निश्चित होताच राठोड बंधूंनी त्यांना कमळेवाडी येथे भोजनास आमंत्रित केले होते. मंगळवारी रात्री लोहा-कंधार तालुक्यांतील काही गारपीटग्रस्त गावांना भेट देऊन मुंडे, विजय गव्हाणे, भाजप उमेदवार डी. बी. पाटील, कार्याध्यक्ष राम पाटील रातोळीकर प्रभृती कमळेवाडीला गेले. रुचकर भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर मुंडे यांनी राठोड बंधूंशी बंद खोलीत चर्चा केली. त्यावेळी दोघांनी भाजपत येण्यास अनुकूलता दर्शविली. त्यांना राजकीय आश्वासन मिळाले नाही. पण माझ्यावर विश्वास ठेवा, असे मुंडे यांनी सांगितल्यावर समर्थकांचा मेळावा घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन राठोड बंधूंनी दिल्याचे समजते.
तत्पूर्वी मुदखेडचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्यावरच शाब्दिक हल्ला केला होता. चौधरी यांचा भाजप प्रवेश नक्की मानला जात असून त्यांनी काँग्रेस सोडल्याने आता भोकर व पूर्वीच्या मुदखेड मतदारसंघात काँग्रेसच्या मतपेढीत फूट पडण्याची भीती व्यक्त होत आहे. पुन्हा सेनेत गेलेले माजी महापौर पांढरे यांच्यासोबत तरुण कार्यकर्त्यांची फौज असल्याने त्यांची नवी राजकीय भूमिका भाजप उमेदवाराच्या दृष्टीने लाभदायी समजली जाते. पांढरे हे धनगर समाजाचे आहेत. हा समाजही काँग्रेसच्या कारभारावर नाराज आहे, असे सांगण्यात आले.
लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली तेव्हा नांदेड मतदारसंघात काँग्रेस पक्ष कागदावर तर भारी वाटत होता. पण निवडणूक प्रक्रिया जवळ येत असताना घडत असलेल्या घटना पक्षासाठी धोकादायक ठरत आहेत. पांढरे, चौधरी, राठोड बंधू यांना काँग्रेसमध्ये सर्वानी आजवर गृहीत धरले. त्यांची उपेक्षा करण्यात आली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच दोघांनी काँग्रेसला रामराम ठोकला तर राठोड बंधू त्याच मार्गावर आहेत.