18 October 2019

News Flash

मुळशीत पुन्हा गँगवॉर, भरदिवसा तलवारीने वार करत तरूणाचा खून

गाडी थांबल्यानंतर हल्लेखोराने गाडीतून ओढून बाहेर काढले आणि तलवारीने सपासप वार केले...

प्रतिनिधीक छायाचित्र

भरदिवसा तरूणाचा खून झाल्यामुळे पुण्यातील मुळशी तालुका गँगवॉरच्या थरारामुळे पुन्हा एकदा हादरला आहे. मुळशी तालुक्यातील लवळे येथे एका तरुणावर भरदिवसा तलवारीने वार करून, निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. प्रतीक प्रकाश सातव (वय 28 सातवमळ, लवळे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील लवळे येथील प्रतीक प्रकाश सातव दोन मित्रासोबत नवीन चार चाकी गाडीने सातवमळयाकडे जात होता. त्याचदरम्यान, राऊतवाडी ते भरे गावाच्या दरम्यान असलेल्या पोल्ट्रीजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरानी प्रतीकच्या गाडीला एक ट्रॅक्टर अचानक अडवा घातला. गाडी थांबल्यानंतर हल्लेखोराने प्रतीक सातवला गाडीतून ओढून बाहेर काढले. त्यानंतर प्रतीकवर तलवारीने सपासप वार करून पळ काढला. या थरारक हल्ल्यात प्रतीकचा जागीच मृत्यू झाला.

प्रतिकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पौड येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला आहे. मयत प्रतिकवर यापूर्वी पौड पोलिस ठाण्यात मारामारीचे दोन गुन्हे दाखल झालेले होते. आरोपींची नावे निष्पन्न झालेली असून त्यांच्या अटकेसाठी दोन पथके पाठविण्यात आली आहेत. ही घटना पूर्व वैमनस्यातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

First Published on October 9, 2019 11:35 am

Web Title: mulshi murder man hacked to death at lavale near nck 90