कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची संख्या पाहता येथे बहुरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी कोल्हापुरातून १४, तर हातकणंगलेतून ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. बुधवापर्यंत कोल्हापूर मतदारसंघात २९ जणांनी ४१ उमेदवारी अर्ज तर हातकणंगले मतदारसंघात २१ जणांनी २९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अखेरच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक विभागाच्या प्रशासनावर ताण पडल्याचे दिसून आले. संध्याकाळपर्यंत आज अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचा तपशील समजू शकला नाही.    
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून विविध पक्षांमध्ये उमेदवार निश्चित करण्यापासून त्यांचे अर्ज दाखल करण्यापर्यंत लगबग उडाली होती. हा आठवडा या घडामोडीतच पार पडला. बुधवार हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची व समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. समर्थकांची उपस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने उमेदवारासह निवडक लोकांनाच अर्ज भरण्यासाठी आत जाण्याची परवानगी दिली. आज अर्ज दाखल करण्यामध्ये आम आदमी पक्षाचे जिल्हा समन्वयक नारायण पोवार व रिपाइं गवई गटाचे जिल्हाध्यक्ष विश्वास देशमुख यांचा समावेश आहे. त्यांच्यासह १४ जणांनी अर्ज दाखल केला आहेत. एकूण २९ जणांनी नामनिर्देशनपत्रे सादर केली असली तरी मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक व शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यामध्ये होणार आहे.    
हातकणंगले मतदारसंघात आज अर्ज दाखल केलेले सर्व उमेदवार अपक्ष होते. येथे आत्तापर्यंत २१ जणांनी नामनिर्देशनपत्रे भरलेली असली तरी मुख्य लढत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राष्ट्रीय काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यामध्ये होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या मोठी दिसत असली तरी प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात किती जण राहणार आहेत, हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २९ मार्च या दिवशी स्पष्ट होणार आहे. तर उद्या गुरुवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे.