यापूर्वी प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळूनदेखील अचानकपणे बंद झालेली मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी चिकाटीने प्रयत्न केले व त्यानुसार ही विमानसेवा सुरू होण्यासाठी मेहर एअरलाईन्स कंपनीने सकारात्मक पाऊल उचललेदेखील. त्यामुळे अवघ्या सोलापूरकरांच्या आशा उंचावलेल्या. परंतु विमानसेवेला तीन महिन्यांची हमी देण्याची तयारी स्थानिक व्यापारी व उद्योजकांनी शब्द देऊनदेखील दाखविली नाही. त्यामुळे ही विमानसेवा अखेर सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमीवर स्थानिक व्यापारी व उद्योजकांची नकारात्मक भूमिका पाहता नजीकच्या काळात सोलापूरची विमानसेवा हे स्वप्नरंजन ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी २००७-८ साली सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने किंग फिशर कंपनीने ७२ आसन क्षमतेची मुंबई विमानसेवा सुरू केली होती. त्यास कायम उत्तम प्रतिसाद मिळत गेला. आठवडय़ातून चार दिवस चाललेल्या या विमानसेवेचा सरासरी ६५ प्रवासी लाभ घेत होते. तथापि, ही विमानसेवा अचानकपणे कोणतेही कारण न देता बंद पडली. यात कुरघोडीचे राजकारण कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर सोलापूरचे अस्तित्वात असलेले विमानतळ बंद करून हैदराबाद महामार्गावर बोरामणी येथे कॉर्गो विमानतळ उभारण्याचा निर्णय झाला. पंरतु गेल्या सहा-सात वर्षांपासून बोरामणीचे विमानतळाच्या उभारणीचे काम रेंगाळलेच आहे. बोरामणीचे विमानतळ उभारले जाईल, तोपर्यंत जुने अस्तित्वात असलेले विमानतळ तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याच्या मागणीला जोर चढला असता त्याचा गांभीर्याने विचार झाला नाही.
या पाश्र्वभूमीवर अखेर होटगी रस्त्यावरील जुन्या विमानतळावर विविध सुधारणा होऊन रात्रीदेखील विमान उतरण्याची सोय झाली खरी; परंतु विमानसेवेला मुहूर्त मिळत नव्हता. मात्र खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुन्हा एकदा सोलापूर-मुंबई विमानसेवेसाठी पाठपुरावा सुरू केला. यात मध्यंतरी एका विमानसेवा कंपनीने प्रस्तावही तयार केला होता. परंतु तो बारगळला. त्यानंतर अलीकडे मेहेर एअरलाईन्स कंपनीने १८ आसन क्षमतेची विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार दोन महिन्यापूर्वी सोलापुरात विमानसेवा कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक व्यापारी व उद्योजकांची संयुक्त बैठक खासदार मोहिते-पाटील यांनी घेतली. त्यावेळी विमानसेवा यशस्वीपणे सुरू राहण्यासाठी पुढील तीन महिन्यांची प्रवाशांनी हमी द्यावी. त्यासाठी पाच हजार रुपये दराची तिकिटे आरक्षित करावीत, अशी अट कंपनीने घातली होती. स्थानिक व्यापारी व उद्योजकांनी कंपनीला तशी हमी देण्याची तयारी दर्शविली होती. विमानसेवा सुरू होणे ही काळाचीही गरज होती. त्यादृष्टीने आशा उंचावल्या होत्या. जून महिन्यात दुसऱ्या आठवडय़ापर्यंत विमानसेवा सुरू होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती.
तथापि, पुढे शब्द दिल्याप्रमाणे विमानसेवेला हमी देण्याच्या दृष्टीने स्थानिक व्यापारी व उद्योजकांनी उदासीनता दाखविली. वारंवार पाठपुरावा करूनदेखील ही उदासीनता कायम राहिली. प्रवासाची हमी मिळाली तरच मेहर एअरलाईन्स कंपनी विमानसेवा सुरू करणार होती. यातच मुळातच तोटय़ात असलेल्या इंडियन एअरलाईन्स कंपनीने सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करणार असल्याची हवा पसरली. त्यामुळे ‘मेहर’च्या विमानसेवेला हमी देण्याचा विचारच संपुष्टात आला. त्यामुळे अखेर ही विमानसेवा बासनात गुंडाळून ठेवावी लागली. यात अगोदर शब्द देणाऱ्या नंतर तो फिरविणाऱ्या स्थानिक व्यापारी व उद्योजकांची विश्वासार्हताही ऐरणीवर आल्याने यापुढे कोणत्याही कंपनीमार्फत विमानसेवा सुरू होण्याची शाश्वती राहिली नाही, असे विमानसेवेशी संबंधित जाणकारांकडून सांगितले जाते.