दिल्लीतील आप सरकारने मोफत वीज, पाणी देण्याची भूमिका घेतली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपाने स्वकर्तृत्वराज ही संकल्पना पुढे आणली असून आगामी निवडणुकांमध्ये ही भूमिका मांडली जाणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पक्षाची रणनिती ठरविण्यासाठी मुंबई प्रदेश भाजपाच्या प्रमुख ४० कार्यकर्त्यांची बठक ९ व १० जानेवारी या दिवशी अलिबाग येथील हॉटेल रविकिरण येथे पार पडली.
बठकीत ‘आप’चा वाढता प्रभाव रोखण्याच्या मुद्दावरही चर्चा झाली. विधान परिषदेतील विरोध पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितले की फुकटराजपेक्षा सामान्य माणसाला क्रयशक्ती वाढविण्याची ताकद देणारे मोदीराज आणले पाहिजे. शेकाप आणि राष्ट्रीय समाज पक्षानेही महायुतीमध्ये सामील व्हावे, असे आवाहन तावडे यांनी केले. लोकसभेसाठी महायुतीच्या जागावाटपाची बोलणी झाली नसली तरी युतीमध्ये कोणताही कलह नसल्याचे तावडे यांनी एका प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.
दोन दिवस चाललेल्या या बठकीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, माजी खासदार जयवंतीबेन मेहता, राम नाईक, पूनम महाजन, अतुल भातखळकर, सरदार तारासिंह, मधू चव्हाण, किरीट सोमय्या, राज पुरोहित, पराग अळवणी आदींसह भाजपाचे मुंबईतील आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राज ठाकरे दुटप्पी – तावडे
मुंबई महापालिका निवडणुकीत गुजराती मते मिळावीत म्हणून मोदींची स्तुती करायची आणि आता भाजप बरोबर जायचे नाही म्हणून मोदींवर टीका करायची ही राज ठाकरेंची भूमिका दुटप्पी असल्याची टीका तावडे यांनी केली.