महापुराच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी चौहीबाजूंनी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अनेक संस्था, संघटना पुढे येऊ लागल्या आहे. प्रशासनापासून ते गणेशोत्सव मंडळांपर्यंत प्रत्येक जण आपआपल्यापरीने या पूरग्रस्तांना मदत करत आहेत. यामध्ये मुंबईच्या डबेवाल्यांनीदेखील मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबईच्या डबेवाल्यांनी ‘नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स’ चॅरिटी ट्रस्ट’च्या माध्यमातून मुंबई रेल्वे स्थानकांवर तसेच स्थानकालगतच्या परिसरात जनतेस मदतीसाठी आवाहन केले आहे.

आपल्या रोजच्या कामाच्या धावपळीतून वेळ काढून मुंबईच्या डबेवाल्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी चर्चगेट, लोअर परेल, दादर, वांद्रे आणि अंधेरी या स्थानकांवर तसेच आजूबाजूच्या परिसरामधील जनेतकडून निधी गोळा करण्याचा उपक्रम राबविला आहे. विशेष म्हणजे जनेतनेही याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमातून जमा होणारा निधी डबेवाले संस्थेचे पदाधिकारी स्वत: पूरग्रस्त भागात जाऊन येथे हा निधी आणि काही वस्तूंचे वाटप करणार आहेत.

डबेवाल्यांनी राबविलेल्या या उपक्रमाला मुंबईकर देत असलेल्या प्रतिसादामुळे मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके आणि मॅक्सविंग्सच्या संचालिका रुणाली पाटील व बाबुराव भोर यांनी मुंबईकरांचे आभार मानले.

दरम्यान, येत्या शनिवारी १७ ऑगस्ट रोजी डबेवाले संस्थेचे पदाधिकारी पूरग्रस्त भागात जाणार आहे. त्यासोबतच जर आपणास मदत करायची इच्छा असेल तर ७०२१४२५९४९ या क्रमांकवर संपर्क साधण्याची विनंतीही संघटनेतर्फे करण्यात आली आहे.