मुंबई ते गोवा जलमार्गावर सागरी पर्यटनाचा आनंद देणाऱ्या देशातील पहिल्या आंतरदेशीय ‘आंग्रीया’ क्रूझला कोकणात थांबा न दिल्याने माजी खासदार नीलेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई- गोवा मार्गावर सुरु करण्यात आलेली आंग्रीया क्रुझ नेमकी कोणासाठी आहे? कोकणात एकही थांबा न देता सरळ गोव्याला निघून जाणारी ही क्रूझ फक्त गोव्याला जाऊन जुगार खेळणाऱ्यांसाठीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई ते गोवा जलमार्गावर देशातील पहिल्या आंतरदेशीय ‘आंग्रीया’ क्रूझला नुकताच हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आंग्रीया क्रूझवर १०४ खोल्या असून सुमारे ४०० पर्यटकांच्या लवाजम्यासह या क्रूझचा प्रवास होणार आहे. या क्रूझला कोकणात थांबा न दिल्याने नीलेश राणे यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली. ‘मुंबई – गोवा मार्गावरील आंग्रीया क्रुझ नेमकी कोणासाठी आहे? कोकणामध्ये एकही थांबा न देता सरळ गोव्याला निघून जाणारी ही क्रूझ फक्त गोव्याला जाऊन जुगार खेळणाऱ्या साठीच आहे असं वाटतं. मध्यमवर्गीय व पर्यटनासाठी या क्रूझचा उपयोग शून्य’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मुंबई- गोवा सागरी मार्गावर आंग्रीया क्रूझ २४ ऑक्टोबरपासून अधिकृतपणे पर्यटकांना घेऊन प्रवास करणार आहे. आंग्रीया क्रूझवर १०४ खोल्या असून सुमारे ४०० पर्यटकांच्या लवाजम्यासह या क्रूझचा प्रवास होणार आहे. यासाठी सहा ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान प्रवास तिकीट आकारण्यात येणार आहे. चार ते चौदा व्यक्तींच्या कुटुंबासह जोडप्यांसाठी खास खोल्यांची सुविधा क्रूझमध्ये करण्यात आली आहे. या खोल्या सर्व सुखसोयींनी सज्ज आहेत. खोल्यांच्या निवडीनुसार प्रवास खर्च आकारला जाईल. शिवाय डेक बार, रेस्ट्रो बार, डिस्को बार, जलतरण तलाव, स्पा, वाचनालय कक्ष अशा सुविधा क्रूझवर आहेत.