मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ वडपाले येथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एसटी बस जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत 57 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला. यावेळी महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती. ही बस गणेश भक्तांना घेऊन मुंबईतील परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे चालली होती.

बसला आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश भक्तांना घेऊन ही बस मुंबईतील परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे जात असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास माणगावजवळ वडपाले येथे बसने अचानक पेट घेतला. यावेळी बसमध्ये 57 प्रवासी होते. सुदैवाने त्यांना तातडीने बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे ते थोडक्यात बचावले, मात्र त्यांचे सामान जळून खाक झाल्याची माहिती आहे. सर्वजण गणेशोत्सवासाठी गावी निघाले होते. दरम्यान अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती, सध्या वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याची माहिती आहे.