News Flash

आणखी दोन वर्षे कोकणचा प्रवास खडतर

मुंबई-गोवा रुंदीकरणास आता २०१८ अखेरचा मुहूर्त

मुंबई-गोवा रुंदीकरणास आता २०१८ अखेरचा मुहूर्त

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम २०१८च्या अखेरीस पूर्ण होणार असल्याने आणखी दोन वर्षे तरी कोकणचा प्रवास खडतरच राहणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची हवाई पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पुढील वर्षांच्या अखेरीस होईल, असे स्पष्ट केले.

गेल्या सहा वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. या पाश्र्वभूमीवर रुंदीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गडकरी यांनी शुक्रवारी या भागाचा हवाई दौरा केला. पनवेल ते झाराप या दरम्यानच्या महामार्ग रुंदीकरणाचे काम २०१८ अखेरीस पूर्ण होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. महामार्ग रुंदीकरणासाठी केंद्र सरकारने १२ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पळस्पे ते इंदापूर दरम्यानचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. यासाठी आता स्टेट बँकेचे अर्थसाह्य़ लाभले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून आणखी ४५० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. दरम्यान, अलिबाग-वडखळ, माणगाव, पाली-खोपोली, महाड-रायगड किल्ला, गुहागर-चिपळूण हे सर्व राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहेत. अलिबाग-वडखळ मार्गाचा प्रकल्प अहवालही तयार झाला असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

सागरी महामार्गालाही चालना

अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्कोच्या धर्तीवर कोकणताही सागरी महामार्ग विकसीत करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. या कामासाठी एका विदेशी कंपनीला प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे ते म्हणाले.

१११ नद्यांवर जलवाहतूक

देशभरातील १११ नद्यांवर जलवाहतूक सुरू करण्याचा मानस असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. त्यात कोकणातील नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. कोकणातील नद्यांचे खोलीकरण करून त्यांतील गाळ रस्त्यांच्या कामासाठी वापरता येईल का, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मंत्रिमहोदय म्हणाले.

सावित्री नदीवरील पुलाचे काम दहा महिन्यांत..

सावित्री नदीवर सहा महिन्यांत नवीन पूल उभारला जाईल, अशी घोषणा गडकरी यांनी महाड दुर्घटनेनंतर केली होती. मात्र, आता हा पूल दहा महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जूनअखेरीस नवीन पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्र्यांनी जाहीर केले. गेल्या वर्षी २ ऑगस्ट रोजी महाडनजीक सावित्री नदीवरील पूल कोसळला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 1:07 am

Web Title: mumbai goa highway widening
Next Stories
1 सूरजागडावर पुन्हा पोलिस बंदोबस्तात ‘लॉयड’चे लोह उत्खनन सुरू
2 ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवलेंची हत्या
3 बरॅकमध्ये जवानाने घेतला गळफास, कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Just Now!
X