मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली ते वाकेड या टप्प्यातील रस्त्याच्या कामाला तातडीने गती देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या शासनामध्ये भूपृष्ठ वाहतूक मंत्री असलेले नितीन गडकरी यांनी गेल्या पाच वर्षांत या महामार्गाच्या चौपदरीकरणाला चांगली गती देण्याचा प्रयत्न केला . तरीही रायगड जिल्ह्यातील दीर्घ काळ  रखडलेले काम अजून पन्नास टक्केसुध्दा पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यातील विशिष्ट ठेकेदाराला क्षमतेपेक्षा जास्त कंत्राटे दिल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे सांगण्यात येते.

रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते कांटे आणि बावनदी ते वाकेड या टप्प्याची हीच रडकथा असून हे दोन्ही टप्पे एकाच कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. जिल्ह्यात चौपदरीकरणाचे काम सुमारे पन्नास टक्के झाले आहे. पण आरवली ते वाकेड टप्पा जेमतेम दहा टक्के झाला आहे. रस्त्यावर पडलेले खड्डेही बुजवण्यात आलेले नाहीत.

डोंगर कटाई, रस्त्यावर आलेली माती आणि अर्धवट मोर्यालमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. या पाव्र्म भूमीवर खासदार राऊत यांनी मंगळवारी केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेतली.

यापैकी एक कंत्राट संबंधित ठेकेदाराकडून काढून घेण्याची कारवाई सुरू झाली आहे.  पण नव्याने निविदा काढून कंत्राट देण्याची प्रक्रिया राबवल्यास काम सुरू होण्यासाठी लागणारा विलंब लक्षात घेता, संबंधित ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाची तातडीने बैठक घेऊन या विषयावर मार्ग काढण्याची मागणी खासदार राऊत यांनी गडकरी यांच्याकडे केली आहे . ठेकेदार कंपनीला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत किंवा कंपनीच्या अडचणी लक्षात समजून घेऊन उपाययोजनेसाठी संयुक्त बैठक घ्यावी, अशी सूचना केंद्रीय मंत्र्यांना केल्याचे खासदार राऊत यांनी ’लोकसत्ता’ सांगितले.