गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सात वर्षांनंतरही रखडलेलेच

शासनाचे काम आणि दहा वर्षे थांब अशी एक म्हण प्रचलित आहे. रायगडसह तमाम कोकणातील चाकरमान्यांना याचा सध्या प्रत्यय येतोय. पळस्पे ते इंदापूरदरम्यान सुरू असलेल्या महामार्ग रुंदीकरणाचे काम सात वर्षांनंतरही पूर्ण होऊ शकलेले नाही आणि नजीकच्या काळात हे काम पूर्ण होण्याची चिन्हेही दिसत नाही. खड्डय़ांचा जाच आणि धुळीचा त्रास सहन करत कोकणवासीयांचा प्रवास सुरूच आहे.

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून महामार्गाच्या कामांना गती मिळाली, पूर्वी दिवसाला दोन किलोमीटर रस्ता बनायचा. आता दररोज २४ किलोमीटरचे रस्ते होण्यास सुरवात झाली. रखडलेले प्रकल्प मार्गी लागले अशी वक्तव्ये हल्ली परवलीची झाली आहेत. मात्र सरकार बदलून साडे तीन वर्षे लोटली तरी मुंबई-गोवा महामार्गाची परिस्थिती काही बदलली नाही. घोषणा अनेक झाल्या मात्र काम नाही. इंदापूर ते झाराप दरम्यानच्या मुंबई गोवा महामार्ग,  त्याला जोडणाऱ्या प्रमुख राज्य मार्ग, बंदरांना जोडणारया मार्गाचे रुंदीकरण करण्याच्या घोषणा झाल्या. मात्र यातील एकाही कामाला गती मिळू शकलेली नाही.

महामार्गाची आजची परिस्थिती दयनीय आहे. पळस्पे ते इंदापूरदरम्यान महामार्गावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांना गाडय़ा चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. अपघातांचा आलेख उंचावला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे दुचाकीस्वारांच्या अपघातांची संख्या अधिक आहे. खड्डय़ात आपटून दुचाकी चालकांचा तोल जातो आणि मागून येणारी अवजड वाहने त्यांच्या आंगावरून जातात. गेल्या दोन महिन्यात पनवेल ते पेणदरम्यान अशा चार घटना घडल्या आहेत.

प्रामुख्याने पळस्पे ते कर्नाळा खिंड, हमरापूर ते भोगावती पूल, पेण ते वडखळदरम्यान रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था आहे. मुख्य रस्त्याची काम जवळपास बंद आहे. मात्र रस्त्याच्या दुभाजक तयार करणे, रस्त्यालगत भराव करणे अशी काम सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील कामाला २०११ मध्ये मंजुरी देण्यात आली. ८४ किलोमीटर लांबीच्या बीओटी तत्वावर विकसित केल्या जाणारया महामार्गावर सहा मोठे पूल, २४ छोटे पूल, दोन उड्डाण पूल, सात भुयारी मार्गाचा समावेश आहे. या कामासाठी ९५० कोटी खर्च अपेक्षित होता. एप्रिल २०१४   अखेर हे काम पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०१७ चा ऑक्टोबर उजाडला तरी महामार्गाचे ५० टक्केही काम पुर्ण होऊ शकलेल नाही. मात्र या दिरंगाईमुळे प्रकल्पाचा खर्च मात्र वाढत चालला आहे.

दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न होण्यामागची अनेक कारणे सांगितली जातात. यात कधी भूसंपादन काम रखडले म्हणून, कधी पर्यावरण विभागाचा अडसर आला म्हणून, कधी ठेकेदाराकडचे पसे संपले म्हणून, तर कधी अतिवृष्टीमुळे रस्ते नादुरुस्त झाल्याने ही काम रखडली असल्याचे सांगीतले जाते. मात्र या सहा वर्षांत जी रस्त्याची कामे झाली त्यांची परिस्थितीही चिंताजनक आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

महामार्गावरील पूल, भुयारी मार्ग, उड्डाण पुलाची काम आजही अपूर्णावस्थेत आहेत. वडखळ बायपास मार्गाचे कामही संथ गतीने सुरू आहे. सुकेळी खिंड, कर्नाळा खिंडीतील काम अद्याप मार्गी लागलेली नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होईल याची शाश्वती नाही.

महामार्ग भूसंपादनाची सध्याची परिस्थिती

पळस्पे ते इंदापूर – पहिला टप्पा

रायगड जिल्ह्य़ात दोन टप्प्यांत मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. यात पळस्पे ते इंदापूर आणि इंदापूर ते कशेडी या दोन टप्प्यातील कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील रुंदीकरणाचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. ८४ किलोमीटरच्या या मार्गासाठी एकूण २१७ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार असून यापकी २०० हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे. अद्यापही १७ हेक्टर क्षेत्राचे संपादन बाकी आहे, पहिल्या टप्प्यातील भूसंपादनासाठी ४७६ कोटी रुपये प्राप्त झाले होते. यातील ४०७ कोटी रुपये प्रकल्पबाधितांना मोबदला म्हणून वितरित करण्यात आले आहे.

इंदापूर ते कशेडी – दुसरा टप्पा

दुसऱ्या टप्प्यात इंदापूर ते कशेडी या ७१ किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण केले जाणार आहे. यासाठी ४७ गावातील २३० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यापकी २२० हेक्टर जमीन संपादनाचे काम पूर्ण झाले आहे. या भूसंपादनासाठी शासनाकडून ५४१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यापकी ३९० कोटी रुपये प्रकल्प बाधितांना मोबदला म्हणून वितरित करण्यात आले आहे. संपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेल्या एकूण जागेपकी ७० हेक्टर जमिनीचा ताबा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात आला असून उर्वरित जागेचा ताबाही या महिन्या अखेपर्यंत दिला जाणार आहे. उर्वरित १० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन या महिन्याअखेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

महामार्गावरील अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर २०१२ ते २०१६ या कालावधीत दोन हजार ५४२ अपघात झाले. यात ५४८ जणांचा जीव गेला, तर २,६४२ हून अधिक जण जखमी झाले, तर २०१७ मध्ये जुलपर्यंत रायगड जिल्ह्य़ाच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर २१३ अपघात झाले. यात ४० जणांना जीव गमवावा लागला. तर २३३ जण जखमी झाले. यापकी १२१ जण गंभीर होते. यातील काहीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलादपूरजवळ नुकत्याच झालेल्या अपघातात पाच जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. ट्रकने सहा आसनी रिक्षाला धडक दिल्याने हा अपघात झाला होता.

अनेक प्रयत्न करूनही मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला अपेक्षित गती मिळू शकलेली नाही. या संदर्भात नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यासोबत मंत्रालयात बठक झाली. त्यामुळे आता या कामाचा ठेकेदार बदलण्याबाबत शासनस्तरावर विचार सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. तर दुसऱ्या टप्प्यातील काम नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल.  – प्रकाश मेहता, पालकमंत्री रायगड.