मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.

या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर होणार आहे. दरम्यान देशमुख यांच्या याचिकेला उत्तर देण्यास न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला ४ आठवड्यांचा अवधी दिला आहे.

तसंच सीबीआयने केलेल्या सक्तीच्या कारवाईपासून देशमुख यांना संरक्षण देण्याचंही न्यायालयाने फेटाळलं आहे. खटल्याची गरज लक्षात घेऊन अत्यावश्यक असल्यास न्यायालयाच्या सुट्टीदरम्यान कार्यरत असलेल्या खंडपीठाकडे जाण्यासही देशमुखांना सांगितलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार सीबीआयने त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात हा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. तसंच सीबीआयला कठोर कारवाई करण्यापासून मज्जाव करण्याचीही मागणी केली आहे.