थर्माकोलच्या वस्तू, मखर आणि सजावट साहित्यांवरील बंदी कायम ठेवत मुंबई हायकोर्टाने थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशनला शुक्रवारी हादरा दिला. असोसिएशनची विनंती फेटाळून लावल्याने गणेशोत्सवादरम्यान थर्माकोलच्या मखरांवर बंदी आली आहे.

गणेशोत्सवात मखरे आणि सजावट साहित्यात थर्माकोल व प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सरकारने मार्चमध्ये प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी घातली असून २३ जून या कायद्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात लागणारे मखर आणि अन्य सजावट साहित्यांच्या उत्पादनाची तयारी अगोदरपासूनच होते. थर्माकोलचे मखर आणि सजावट साहित्यांवरही बंदी घातली तर सजावट करणारे आणि मखर विकणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते. अनेक मराठी तरूणांनी ही मखरे तयार केली असून यंदा गणेशोत्सवासाठी थर्माकोल वापरण्याची मुभा द्यावी, अशी विनंती याचिका असोसिएशनतर्फे मुंबई हायकोर्टात दाखल झाली होती. या बंदीमुळे घाऊक विक्रेते तसेच सजावट आणि मखर तयार करणारे कलाकार यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल, असा युक्तिवाद असोसिएशनतर्फे अॅड. मिलिंद परब यांनी हायकोर्टात केला होता.

शुक्रवारी हायकोर्टात न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. पर्यावरणाला हानिकारक गोष्टींना परवनागी देता येणार नाही, असे स्पष्ट करत हायकोर्टाने विनंती याचिका फेटाळून लावली. हायकोर्टाने थर्माकोलचे मखर आणि सजावट साहित्यांवरील बंदी कायम ठेवली आहे.