रस्ते बांधणी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘आयडियल रोड वेज’चे संस्थापक आणि प्रसिध्द उद्योजक दत्तात्रय पी. म्हैसकर यांचे बुधवारी संध्याकाळी राहत्या घरी अल्पश: आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुधाताई, मुलगा ‘आयआरबी’
इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र, ‘एमईपी’ इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक जयेंद्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पुणे येथून अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियंता (सिव्हील) पदाची पदवी घेतल्यानंतर दत्तात्रय म्हैसकर यांनी सुरूवातीच्या काळात खासगी बांधकाम कंपनीत नोकरी केली. त्यानंतर मुंबई महापालिकेत बांधकाम विभागात अभियंता म्हणून नोकरी केली. नावीन्यपूर्ण करण्याचा करण्याची वृत्ती असल्याने दत्तात्रय म्हैसकर यांचे नोकरीत मन रमले नाही. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. ‘आयडीयल रोड वेज’ बांधकाम कंपनीची स्थापना केली. सुरूवातीच्या काळात त्यांनी मुंबई पालिकेत रस्ते ठेकेदार म्हणून काम सुरू केले. केलेले काम दर्जेदार, चोख असले पाहिजे, याकडे त्यांचा पहिल्यापासून कटाक्ष होता. त्यामुळे रस्ते कामातील एक अग्रगण्य ठेकेदार म्हणून ते अल्पावधीत लोकप्रिय झाले.

Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री

‘आयआरबी’ ही राज्यातील रस्ते बांधणी क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून नावलौकिकास आणण्यास म्हैसकर यांचा सिंहाचा वाटा
होता. रस्ते बांधणीचा दर्जा, त्याचा टिकावपणा आणि विश्वासू ठेकेदार म्हणून मिळालेल्या कामाच्या पावत्यांमधून महाराष्ट्रातील अनेक रस्ते कामे त्यांना शासनाकडून मिळाली. युती सरकारच्या काळात राज्य महामार्ग क्रमांक तीनवरील ठाणे ते भिवंडी हा पहिला टप्पा ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरित’ करा तत्वावर बांधून देण्याची पहिली मुहूर्तमेढ म्हैसकर यांनी रोवली. त्यानंतर राज्यभर ‘बीओटी’ ही संकल्पना आकाराला आली. खंडाळा घाटाला वळण देऊन उभारलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे टोल वसुलीचे काम त्यांना मिळाले. रस्ते बांधणीतील दर्जेदारपणामुळे ‘आयआरबी’ कंपनीला राज्याबाहेर रस्ते कामे मिळाली. रस्ते कामासाठी ‘एमएसआरडीसी’ला ९१८ कोटीचा धनादेश देणारे ते पहिले ठेकेदार आहेत. राज्याच्या विविध भागात केलेल्या दर्जेदार रस्ते कामांमुळे म्हैसकर हे रस्ते कामातील एक पायोनीर म्हणून ओळखले गेले. रस्ते बांधणी, बीओटी धोरण आणि टोल ही संकल्पना आयआरबी कंपनीमुळे राज्यात रुजली.

प्रत्येक व्यक्तिने सुदृढ असले पाहिजे म्हणून डोंबिवली जिमखान्यात अत्यावश्यक सुविधा देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. जिमखान्याचे आधारस्तंभ म्हणून ते ओळखले जातात.

स्थापत्या अभियंता म्हणून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९६३ मध्ये मुंबईत मे. शहा कन्सट्रक्शन कंपनीत नोकरी. त्यानंतर मुंबई महापालिकेत अभियंता म्हणून काम केले. नोकरीचा राजीनामा देऊन १९७८ मध्ये आयआरबी कंपनीची स्थापना केली. पालिकेत रस्ते ठेकेदार म्हणून काम सुरू केले. विश्वासर्हता, चोखपणा, सचोटी, कामातील सातत्य यामुळे म्हैसकर यांनी स्थापन केलेल्या ‘आयआरबी’ कंपनीला अल्पावधीत राज्याच्या विविध भागात कामे मिळाली. रस्ते बांधणी, पायाभुत सुविधांमध्ये ५० वर्षांचा दांडगा अनुभव. २००४ मध्ये ९१८ कोटीचा शासनाला धनादेश देणारा पहिला मराठी ठेकेदार म्हणून म्हैसकर ओळखले गेले. साधी राहणी, अबोल स्वभावामुळे ते समाज, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नसले तरी, समाजाचे आपण काही देणे आहोत म्हणून त्यांचे शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राशी निकटचे संबंध होते. पेंढरकर महाविद्यालयातील प्रयोगशाळा, ग्रंथालयाच्या उभारणीत त्यांनी सहकार्य केले. अनेक अडलेल्या, गरजू व्यक्तिंना त्यांनी झाकल्या मुठीतून मदत केली. पदरी अनेक चारचाकी वाहने असुनही त्यांनी आयुष्यातील बहुतांशी प्रवास लोकलने केला. वाहतूक कोंडीची दगदग नको म्हणून ते नेहमी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ स्वत:चे वाहन चालकाला उभे करण्यास सांगत, तेथून ते मुंबई परिसरात वाहनाने प्रवास करीत असत. ‘आयआरबी’ने डोंबिवलीत केलेला दणकट मानपाडा रस्ता आजही अनेकांच्या स्मरणात आहे. सामाजिक कार्यासाठी त्यांनी म्हैसकर फाऊंडेशनची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात होते. कल्याण गायन समाजाच्या उभारणीत त्यांचे महत्वाचे योगदान होते.