कोल्हापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. गेल्या सहा वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता. मात्र, केंद्र सरकारच्या उडान योजनेत कोल्हापुरचा समावेश झाल्यानंतर या हवाई मार्गाच्या प्रस्तावाला गती मिळाली आणि आता कोल्हापुरकरांचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. येत्या २४ डिसेंबरपासून ही सेवा सुरु होणार आहे . दर मंगळवार,बुधवार व रविवारी कोल्हापूरहून मुंबईला जाणारे विमान सुटेल. प्रवासी या विमानसेवेचे तिकीट आरक्षित करू शकतात, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी खासदार संभाजीराजे यांनी केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. ते म्हणले , एयर डेक्कनचे विमान नियोजित दिवसांमध्ये दुपारी सव्वा वाजता मुंबईहून कोल्हापुरच्या दिशेने उड्डाण करेल. दुपारी अडीच वाजता हे विमान कोल्हापूरमध्ये पोहोचेल. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता हेच विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने उड्डाण करेल. दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी हे विमान मुंबईत पोहोचेल, अशी माहिती एयर डेक्कनच्या अधिकाऱ्यांनी  दिली.

उडान योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर वाहतूक परवाना आणि मुंबईतील स्लॉट (वेळ) या कारणास्तव विमानसेवा सुरु होण्यास विलंब होत होता. खासदार संभाजीराजे यांनी सुरुवातीपासूनच  ही सेवा सुरु होण्यासाठी मुंबई व दिल्ली येथे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता . गेल्याच आठवड्यात त्यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेतली होती. या विमान सेवेमुळे कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून जिल्ह्यात निश्चितपणे गुंतवणूक वाढेल. कोल्हापूर हे राज्यातील महत्त्वपूर्ण शहर असल्यामुळे या कनेक्टिव्हिटीचा मोठा फायदा जिल्ह्याला होईल, असा विश्वास संभाजीराजे यांनी व्यक्त केला.