गोवा कर्नाटक लगत समुद्रामध्ये ‘महा’ वादळामुळे पावसाचे वातावरण असून कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी पावसानं नागरिकांना बेसावध अवस्थेत गाठलं असून दक्षिण मुंबई व पश्चिम उपगरांमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली. दक्षिणेकडून उत्तरेकडे हे वादळ सरकत असून परिणामी येत्या 24 तासांमध्ये मुंबईसह लगतच्या परीसरामध्ये पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे, नाशिक, डहाणू या भागामध्ये हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऐन दिवाळीतही पावसानं पाठ सोडली नसल्यामुळे नागरिकांमध्ये निरुत्साहाचे वातावरण असून पावसापासून अजूनही सुटका झाली नसल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास दक्षिण मुंबईमध्ये नागरिकांना पावसानं अवचित गाठलं. तर बांद्र्यामध्ये जोरदार पावसाची सर कोसळल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली.

‘महा’ हे वादळ 40 ते 60 किलोमीटरच्या गतीनं उत्तरेकडे सरकत असून महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आठ ते 12 फूट उंचीच्या लाटांची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रतीरावरील नागरिकांनी सावध रहावं अशी सूचना स्कायमेटनं दिली आहे.