बहुप्रतीक्षित ‘रो रो’ सेवेला उद्यापासून प्रारंभ

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

अलिबाग : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘रो रो’ (भाऊचा धक्का ते मांडवा) सेवेला रविवार, १५ मार्चपासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता मांडवा येथून या जलवाहतूक सेवेला प्रारंभ केला जाणार आहे. त्यामुळे कोकणातील जलवाहतुकीला नव्याने चालना मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘भारतमाला’ प्रकल्पांतर्गत मुंबई महानगराला जलवाहतुकीने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील भाऊचा धक्का आणि अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे सुसज्ज टर्मिनल आणि जेटी उभारण्यात आली आहे. ही सेवा जून २०१८ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, बोट उपलब्ध न झाल्याने ही सेवा रखडली होती. अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘प्रोटोपोरस’ नामक बोट गेल्या महिन्यात मुंबईत दाखल झाली आहे. तिच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून, उद्यापासून ही सेवा कार्यान्वित केली जाणार आहे.

‘रो रो’ सेवेमुळे मुंबईहून अलिबागला मोठय़ा संख्येने वाहने घेऊन जाणे सहज शक्य होणार आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडी टाळता येईल. तसेच या बोटीने साडेतीन तासांचे अंतर अवघ्या ५० मिनिटांत पार करता येणार आहे. या प्रकल्पामुळे जलवाहतुकीचे नवे पर्व सुरू होईल. त्याचबरोबर अलिबागच्या पर्यटन व्यवसायाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

२०१२ पासून या प्रकल्पाची चर्चा सुरू होती. सुरुवातीला ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’च्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार होता. मुंबई, नवी मुंबई या दोन महानगरांना जलवाहतुकीने जोडण्यात येणार होते. मात्र यात रायगडचाही समावेश केला जावा, अशी मागणी करण्यात आली होती. २१ फेब्रुवारी २०१३ रोजी या जलवाहतूक सेवेची जनसुनावणी सासवणे येथे पार पडली. या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रकल्पाची बाजू उचलून धरली, तर शेकापने प्रकल्पाला विरोध केला होता.

त्यानंतर मात्र हा प्रकल्प केंद्र सरकारच्या ‘भारतमाला’ योजनेंतर्गत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी पुढाकार घेतला. निधीही उपलब्ध करून देण्यात आला.  विक्रमी वेळात भाऊचा धक्का आणि मांडवा येथे ‘रो रो’ टर्मिनलची उभारणी करण्यात आली. मांडवा येथे समुद्रात ‘ब्रेक वॉटर’ बंधाराही उभारण्यात आला. मात्र बोट उपलब्ध न झाल्याने ही जलवाहतूक सेवा रखडली होती. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आता ही बहुप्रतीक्षित ‘रो रो’ सेवा उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

मांडवा बंदरात गाळाची समस्या

मांडवा बंदरात गाळाची समस्या वारंवार उद्भवत आहे. तीन वर्षांत जवळपास २५ कोटी रुपयांचा निधी गाळ काढण्यावर खर्च झाला आहे. ‘एमएमबी’कडून गाळ उपसण्याच्या कामासाठी प्रथम २०१७-१८ मध्ये १६ कोटींची निविदा काढण्यात आली. त्यानंतर २०१८-१९ मध्ये ४ कोटी ५० लाख आणि २०१९-२० या वर्षांसाठी मेरीटाईम बोर्डाकडून ४ कोटी ५० लाख रुपये खर्चून मांडवा येथील गाळ उपसण्यात आला आहे.

सर्वसामान्यांसाठी ‘रो रो’ सेवा खर्चीक  

रो रो सेवेसाठी मांडवा येथून मुंबईत जाण्यासाठी एका वेळेला १ हजार १०० ते १ हजार ५४० रुपये लागतील. दोन्ही बाजूने प्रवास केल्यास २ हजार २०० ते ३ हजार ८० रुपये मोजावे लागतील. मात्र रस्ते मार्गाने हा प्रवास केल्यास दोन्ही बाजूचा प्रवास १ हजार ५०० रुपयांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे ‘रो रो’ सेवा सामान्यांसाठी खर्चीक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडतील असे दर ठेवावेत, अशी मागणी केली जात आहे.

अलिबागच्या पर्यटन व्यवसायाला ‘रो रो’ सेवेमुळे खऱ्या अर्थाने चालना मिळेल. मुंबई ते अलिबाग हे अंतर दोन तासांनी कमी होईल. ‘रो रो’ सेवेचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे ठरवावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याशिवाय मांडवा ते अलिबाग दरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ‘एमएमआरडीए’कडे पाठपुरावा सुरू आहे.

-महेंद्र दळवी, स्थानिक आमदार

गेली आठ वर्षे ही जलवाहतूक सेवा सुरू व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आता ही सेवा सुरू होत असल्याचा विलक्षण आनंद आहे. ‘रो रो’ सेवेचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. ते दर शासनाने कमी करावेत.

– अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, स्थानिक