बहुप्रतिक्षीत मुंबई ते मांडवा या सागरी मार्गावरील रो—रो सेवा सुरु होण्यास मुहुर्त अखेर सापडला आहे . गुरूवारपासून भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो रो बोट धावणार आहे. या सेवेमुळे गणेशोत्सवासाठी अलिबाग, मुरुड आणि  श्रीवर्धन तालुक्यात येणाऱ्या  चाकरमान्यांचा प्रवास सुखकारक होणार आहे.

१५ मार्च रोजी ही सेवा घाईघाईत सुरु करण्यात आली. मात्र, करोनामुळे दुसऱ्याच दिवशी ती बंद करावी लागली होती. अखेर गौरी—गणपतीच्या सणासाठी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची गर्दी टाळण्यासाठी गुरूवार २० ऑगस्टपासून सुरु होणार आहे. सकाळी ९.१५ वाजता व्यावसायिक तत्वावर प्रवाशांची पहिली बोट मुंबईतील  भाऊचा धक्का येथून मांडवा बंदराकडे निघणार आहे. हीच बोट सायंकाळी ४ वाजता मांडवा येथून परतीचा प्रवास करेल. हे वेळापत्रक ३० ऑगस्टपर्यत कायम राहणार असून त्यानंतर प्रवाशांचा ओघ पाहुन बदल केला जाणार असल्याची माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली आहे. यासाठीचे ऑनलाईन बुकिंगदेखील सुरु झाले आहे.

गणेशोत्सवामध्ये मुंबई—गोवा महामार्गावर वाहनांची मोठय़ा प्रमाणात रहदारी वाढत असते. मुंबईतून बाहेर निघतानाच तासन्तास वाहतूक कोंडीमुळे होणारा  वैतागवाणा प्रवास टाळता येणार आहे. या रो—रो बोटीतून मुंबईतील चाकरमान्यांना स्वत:चे वाहन घेऊन रायगडमध्ये येता येणार आहे. ही सेवा गौरी—गणपतीच्या सणासाठी सुरु करावी, अशी मागणी येथील प्रवासी करीत होते.

‘या बोटीमध्ये सोशल डिस्टन्सिग पाळणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर सर्व सोयीने युक्त असलेल्या फेरीबोटीमधून सागरी पर्यटनाचा मनमुराद आनंद प्रवाशांना लुटता येणार आहे. प्रवासासाठी एम २ एम फेरी सव्‍‌र्हिसेसच्या अधिकृत वेबसाईटवरुन बुकींग सुरु झाली आहे. ’

—हाशिम मोंगिया, संचालक, रो—रो सव्हिसेस (एम २ एम फेरीबोट)