भाजपाचे नगरसेवक कुठलाही अभ्यास न करता आंदोलनं करतात अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपाला सुनावलं आहे. करोनाची एवढी कठीण परिस्थितीतही विरोधकांचा महाराष्ट्रातलं सरकार हलवण्याचाच प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

त्या आज पत्रकारांशी बोलत होत्या. मुंबई महानगरपालिकेच्या करोना काळातल्या कामाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गौरव केला. मात्र, भाजपाला त्याचं काहीच नाही, असंही त्या म्हणाल्या.

केंद्रातून येणाऱ्या लशी अपुऱ्या असल्याने त्याचा लसीकऱणावर परिणाम होत आहे. त्याचा फायदा घेऊन अनेक लोक चुकीचे संदेश देऊन जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मोफत लसींप्रमाणेच मुबलक लसींसाठीही मागं लागायला हवं असंही त्या म्हणाल्या.

मुंबईच्या पुढच्या नियोजनाबद्दलही त्यांनी यावेळी भाष्य केलं. तसंच आत्तापर्यंतच्या मुंबईच्या गौरवशाली कामगिरीबद्दलही त्या बोलल्या. त्या म्हणाल्या, मुंबईत आदित्य ठाकरेंनी पहिलं विलगीकरण केंद्र सुरु केलं. मुंबई मनपाने जम्बो केअर सेंटर्स, फिल्ड हॉस्पिटल्सही सुरु केली. मुंबईच्या नियोजनाबद्दल आणि कारभाराबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही मुंबईच्या प्रशासनाचं कौतुक केलं आहे.

लसीकरणाच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या,” राज्य सरकारला केंद्राकडून लसी पुरवल्या जातात. जशा लसी येतात त्याप्रमाणे लसीकरण चालतं. लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद आहेत. मात्र, जसा लसींचा पुरवठा होत आहे, तशा पद्धतीने त्याचं वितरण मनपा करत आहे”.