राज्यातील इतर शहरांप्रमाणेच मुंबईतील करोना परिस्थिती चिंताजनक आहे. बेड, ऑक्सिजनसह रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असून, महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, विरोधकांकडून सातत्याने टीका होताना दिसत आहे. रेमडेसिवीर उत्पादक कंपनीच्या मालकाची चौकशी केल्याप्रकरणी फडणवीस राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले होते. त्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे मोठं दुर्दैव असल्याचं म्हणत  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाला टोला लगावला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. महापौर म्हणाल्या, “महाराष्ट्र बिकट परिस्थितीत चालला आहे. असं म्हणायला हरकत नाही. या स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम वेगवेगळ्या उपाययोजना करून परिस्थिती कशी सुलभ होईल यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी चालक कमी पडत असल्याने परिवहन मंत्री त्यासाठी काम करत आहे. महापालिका आयुक्तांनी ऑक्सिजन उत्पादकांनाही आदेश दिले आहेत. शनिवारी आणि रविवारी जिथे ऑक्सिजन कमी पडला, तिथले रुग्ण दुसरीकडे हलवलं होतं, अशा पद्धतीने लढा दिला जातोय,” असं त्यांनी सांगितलं.

“राज्याची जशी परिस्थिती आहे, त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे. पण तसं दिसत नाही. एकीकडे विरोधक खूपच आक्रमक झालेले आहेत. योद्धा म्हणून काम करायला तयार नाहीत. परिस्थिती जास्तीत जास्त कशी बिकट होईल, यासाठी लक्ष दिलं जातंय. खूपच कठिण परिस्थितीतून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता जात आहे. सोशल माध्यमातून हा आक्रोश दिसतो आहे. जबाबदारी केलं तर निश्चितच बाहेर पडू. जे दिसतंय ते मी बोलतेय. रेमडेसिवीरचा साठा केलेल्या पकडल्यानंतर माजी मुख्यमंत्री रात्रीच्या दोन वाजता पोलीस ठाण्यात जातात. उद्देश काहीही असेल, पण महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला रात्रीच्या दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन जावं लागतंय, हे किती मोठं दुर्दैव आहे. ज्याच्याकडे साठा आहे. त्याने द्यावं. मुंबईतही साठा पकडला गेला आहे. लोक वणवण भटकत आहे आणि हे काय चाललंय आहे,” अशी नाराजी महौपारांनी व्यक्त केली.