आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरला स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी याची घोषणा केली. मेट्रो कारशेड स्थलांतरित करण्याच्या निर्णयावरून भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. “आरेमधील कारशेड कांजूरमार्गला हलवणं म्हणजे बाल हट्ट पुरवण्याचा प्रकार आहे,” असं म्हणत भाजपा नेते प्रसाद लाड यांनी अप्रत्यक्षरीत्या आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पोलिसांची बँक खाती ॲक्सिस बँकेत वळवल्याचा हवाला देत उत्तर दिलं आहे.

आरेमध्ये होणाऱ्या मेट्रो कारशेडवरून मागील काही वर्षांपासून वाद सुरू होता. आरेमध्ये मेट्रो कारशेड करण्यास शिवसेनेनं विरोध केला होता. अखेर आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपातील नेत्यांनी टीका केली होती. “आरेमधील कारशेड कांजूरमार्गला हलवणं म्हणजे बाल हट्ट पुरवण्याचा प्रकार आहे,” असं भाजपाचे नेते प्रसाद लाड म्हणाले होते.

आणखी वाचा- मेट्रो कारशेड कांजूरला नेल्याने सरकारी तिजोरीवर आर्थिक ताण, प्रकल्पही लांबणार- फडणवीस

प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे. “आरेमधील कारशेड कांजूरमार्गला हलवणे म्हणजे बाल हट्ट पुरवण्याचा प्रकार आहे, असं आ. प्रसाद लाड म्हणाले असं मी ऐकलंय.. मग प्रश्न असा आहे की, मागील सरकारच्या काळात पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी ॲक्सिस बँकेमध्ये वळवली त्याला कोणता हट्ट म्हणायचा??,” असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा- मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचं एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट; निलेश राणेंनी साधला निशाणा

“मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट”

“आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट. करोडो रुपये वाया जाणार, नवीन परवानग्या कधी मिळतील व मिळतील की नाही माहीत नाही, कारण ती जमीन भुसभुशीत (खारफुटी सारखी) आहे. किमान ५ हजार कोटी या नवीन उभारणीसाठी लागणार… आधीचे पैसे गेले,” असं म्हणत निलेश राणे यांनीही मेट्रो कारशेड स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर टीका केली होती.