फेरीवाल्यांचे समर्थन करणारे अभिनेते नाना पाटेकर यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी समाचार घेतला. ज्या गोष्टीची माहिती नसेल त्यात नाना पाटेकर यांनी चोंबडेपणा करु नये. ते उत्तम अभिनेते आहेत, पण रस्त्यावर काय करायचे हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये अशा शब्दात राज ठाकरेंनी त्यांना सुनावले आहे.

राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील रंगशारदा येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना सुनावले आहे. राज यांनी नाना पाटेकर यांची नक्कलही केली. ‘वेलकम चित्रपटात नाना पाटेकर यांनी फेरीवाल्याचा अभिनय केला होता. कांदे घ्या, बटाटे घ्या असं नाना त्या चित्रपटात म्हणत होता. म्हणूनच बहुधा नानाला फेरीवाल्यांचा पुळका आला असावा’ असे ठाकरेंनी सांगितले. फेरीवाल्यांचा प्रश्न प्रशासनाने सोडवावा असे नाना पाटेकर म्हणतात. पाण्याचा प्रश्नही सरकारनेच सोडवायला पाहिजे. मग यासाठी नाना पाटेकरांनी संस्था का सुरु केली, ते सरकारकडे का गेले नाही, असा सवाल त्यांनी विचारला. नाना पाटेकर यांनी मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्थान मिळावे यासाठी लढा का दिला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नाना पाटेकर यांनी आमच्या बाजूने बोलायला पाहिजे होते, आम्ही त्यांचे अभिनंदन केले असते. पण दुर्दैवाने आज संजय निरुपम त्यांचे आभार मानतोय, असे राज ठाकरेंनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस कमाल माणूस: नाना पाटेकर

मराठी माणसासाठी कितीही केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत. मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी केस नवीन गोष्ट नाही. अस्वलाच्या अंगावर नवीन केस आल्यावर तो दचकत नाही, असे ठाकरेंनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पुण्यात मनसे कार्यकर्त्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवरही राज ठाकरेंनी निशाणा साधला. मुंबईत रस्त्यावर पोलिसाला मारहाण होताना मनसेचे कार्यकर्ते त्याच्या मदतीला धावले होते. मी नेहमीच पोलिसांची बाजू घेतली आणि यापुढे घेणारच. अशीच आपुलकी पोलिसांनीही दाखवावी, असे त्यांनी सांगितले.

फेरीवाल्यांचे समर्थन करणाऱ्या नाना पाटेकर यांचे आभार : संजय निरुपम

मुंबई हायकोर्टाने फेरीवाल्यांबाबत दिलेल्या निकालाचा दाखला देत राज ठाकरे म्हणाले, मी मुंबई उच्च न्यायालयाचे आभार मानतो. आगामी दिवसांमध्ये मनसेचे कार्यकर्ते फेरीवाल्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर, स्टेशन मास्तर यांना देतील. यापुढे हायकोर्टाच्या निर्णयानंतरही फेरीवाले बसले तर संबंधितांवर कोर्टाचा अवमान केल्याची केस टाकणार. फेरीवाल्यांसाठी कोर्टाच्या फेऱ्या मारल्यावर या लोकांना कळेल, असे ठाकरेंनी सांगितले. आज हात जोडून विनंती करतोय की अनधिकृत फेरीवाल्यांना हटवा, आता मला हात सोडायला लावू नका असा इशाराच त्यांनी दिला. सर्व सामान्य नागरिकांनीही या फेरीवाल्यांकडून खरेदी करु नये, असे आवाहन त्यांनी केले.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनेही सांगितलंय की बाहेरुन येणाऱ्या लोढ्यांनी महाराष्ट्रातील शहरांची वाट लागत आहे. बाहेरुन येणारी माणसं कोण आहेत, ते काय करतात याचा थांगपत्ताही नसतो, त्यातूनच हे गुन्हेगार पुढे येतात, माझी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना विनंती आहे की हे विष पोसू नका. अन्यथा आपल्याला शत्रूंची गरज नसून याच विषाशी लढायची वेळ येईल, अशी भीतीही ठाकरेंनी याप्रसंगी व्यक्त केली. मुंबईतील झोपडपट्ट्या पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांचे मोहल्ले आहेत, हेच आपल्या अंगावर येतील. मात्र नपुंसक सरकार या मोहल्ल्यांवर कारवाई करणार नाही, अशी टीका त्यांनी केली.