विधान परिषद निवडणुका पार पडल्यानंतर आता बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भाजपाकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपा युती करणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. चर्चेवर भाष्य करताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावला.

नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राऊत यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं त्यांनी सांगितले. “प्रमुख महापालिकांमध्ये एकत्र निवडणुका लढल्यास चांगले निकाल लागतील. त्यासाठी आम्ही एकत्र बसू, निर्णय घेऊ. आता मुंबई महापालिकेत शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. नाशिकमध्ये आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत. पण, महाविकास आघाडीच्या अनुषंगाने विचार केल्यास तर आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत. सगळ्यांचा सन्मान राखून एकत्र निवडणुका लढवाव्यात असा विचार सुरू आहे,” असं राऊत म्हणाले.

भाजपाने मिशन मुंबई सुरू केलं असल्याचा आणि मनसे भाजपासोबत जाण्याचा मुद्दा यावेळी पत्रकारांकडून उपस्थित करण्यात आला. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले,”आता हैदराबादमध्ये त्यांना ओवेसी मिळाले. मुंबईत कुठल्या पक्षातून ते ओवेसी निर्माण करतात, ते बघावं लागेल,” असं राऊत म्हणाले. मनसे-भाजपा युतीच्या चर्चेवर राऊत म्हणाले,”जाऊद्या ना, कुणीही कुणाबरोबर गेलं, तरीही मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच राहिल. सध्याच्या स्थितीत काहीही बदल होणार नाहीत. मी नाशिकलाही आता बोलतोय की, पुढचा नाशिकचा महापौर शिवसेनेचाच असेल,” असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.